(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील तुरळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सहदेव विठ्ठल सुवरे यांची राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली आहे. एकात्मिक समाजकल्याण संस्था व राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन, बेलगावी यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी सुवरे यांची निवड करण्यात आली आहे.
सामाजिक, लोकोपयोगी व विकासात्मक कार्याबाबत त्यांचे योगदान लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली असून, दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि गोवा या राज्यांतील काही निवडक कार्यकर्त्यांमध्ये सुवरे यांचाही समावेश करण्यात आला आहे.
सरपंच म्हणून गेल्या दोन-तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध शासकीय यंत्रणांशी सातत्याने संपर्क साधून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावासाठी अनेक योजना राबवल्या. पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण आणि ग्रामविकासाच्या दृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न लक्षणीय ठरले आहेत.
या पुरस्कार वितरण समारंभाचा भव्य सोहळा रविवार, दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी रवींद्र भवन, साखळी, गोवा येथे संपन्न होणार आहे. या वेळी विशेष प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, म्हैसूर फेटा, चंदनाचा हार व भारत सरकारच्या केंद्रीय मंत्र्यांचे अभिनंदनपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास देशभरातील लष्करी अधिकारी, सिने अभिनेते, शिक्षण अधिकारी, राजकीय नेते, मठाधिपती आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सहदेव सुवरे यांची निवड झाल्याबद्दल आमदार शेखर निकम, बँक संचालक राजेंद्र सुर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्ते रमेश डिके, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लवकरच गावाच्या वतीने आमदारांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. सुवरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.