(रत्नागिरी)
जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरोग विभागात मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. दारूच्या नशेत एका तरुणाने नर्सेस व रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांशी वाद घालून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर एका सुरक्षा रक्षकाच्या हाताला चावा घेतला. या प्रकारामुळे काही काळ रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हा सर्व प्रकार मंगळवारी 22 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.
प्रणय अशोक कांबळे (रा. कोलेखाजन, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे संशयित आरोपीचे नाव असून, त्याचा मुलगा लहान मुलांच्या वॉर्डमध्ये दाखल आहे. रुग्णालयात दारू पिऊन आलेल्या प्रणय कांबळेने तेथे उपस्थित असलेल्या नर्सेसशी वाद घालण्यास सुरुवात केली. परिस्थिती चिघळू लागल्याने नर्सेसनी सुरक्षा रक्षकांना पाचारण केले.
चार सुरक्षा रक्षक घटनास्थळी पोहोचले आणि प्रणय कांबळे याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अधिक आक्रमक होत सुरक्षा रक्षकांशी झटापट करू लागला. यावेळी त्याने एका रक्षकाच्या उजव्या हाताच्या करंगळीला चावा घेतला. या घटनेनंतर सुरक्षा रक्षक आशिष विलास नागले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी प्रणय कांबळे याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.