(खेड)
दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून बसस्थानकात येथील धिंगाणा घालणाऱ्या आर.डी. आरदवाड, एच.व्ही. भाबड या दोन बसचालकांवर एसटी प्रशासनाने बुधवारी तीन महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी दिली. गेल्या महिन्याभरात दारूच्या नशेत गैरवर्तन करणाऱ्या बसचालकांच्या निलंबनाची ही तिसरी घटना आहे.
मंगळवारी रात्री मद्यप्राशन केलेल्या दोन एसटी चालकांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीची परिणीती अखेर हाणामारीत झाली होती. यामध्ये त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.
या घटनेचा व्हिडीओ बसस्थानकातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. फ्रीस्टाईल हाणामारी पाहण्यासाठी जमलेल्या प्रवाशांनी मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या प्रकाराची एसटी प्रशासनाने गंभीर दखल घेत दोन्ही चालकांवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. २० दिवसांपूर्वीच मद्यप्राशन करुन बस चालवत असताना खाडी पट्टयातील सवणस नजीक दुचाकी अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी बसचालकाचे ही ३ महिन्यांसाठी निलंबनाची करण्यात आले होते.

