(संगमेश्वर)
तालुक्यातील देवडे गावची सुकन्या १९ वर्षीय आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम ही महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी आकांक्षाने पदार्पणातच मालदिव येथे आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत देशाला सुवर्णपदक व वैयक्तिक सुवर्ण पदक व १४ व्या वर्षी राज्यस्तरीय महिला ओपन गटाचे विजेतेपदक मिळवून इतिहास रचला आहे. आकांक्षाने राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेत १ सुवर्ण २ रौप्य पदके मिळविली आहेत. ज्युनिअर राज्यस्तरीय गटात विजेतेपदकाची हॅट्रीक केली आहे.
राज्य महिला एकेरी ओपनचे तब्बल ११ वेळा विजेतेपद मिळविले आहे. आकांक्षाने आतापर्यंत ३१ सुवर्णपदके, ११ रौप्यपदके व १३ कांस्य पदके अशी एकूण ५५ पदके मिळवली आहेत. त्यामधील ४ सुवर्णपदके व १ रौप्यपदक अशी ५ पदके आंतरराष्ट्रीय आहेत.
आकांक्षा रत्नागिरीतील शिर्के हायस्कूलची माजी विद्यार्थिनी आहे. ती सध्या मुंबईमध्ये शिक्षण घेत आहे. तिला तिचे मामा आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संदीप देवरुखकर, महेश देवरुखकर, यश कदम, यतीन ठाकूर, आंतरराष्ट्रीय कॅरमपटू अरुण केदार, शिर्के हायस्कूलचे विनोद मयेकर व जिल्हा कॅरम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.