(रत्नागिरी)
गेल्या तीन वर्षांपासून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. महिन्याभरापूर्वीच जिल्हाधिकारी, राज्य पुरातत्त्व विभाग आणि नगरपालिका यांची संमती घेत रत्नदुर्ग किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे कार्य हाती घेतले, आणि त्याची सुरुवात फलक लावून आणि त्यांचे विधीवत पूजन करून करण्यात आली.
मात्र, मंगळवर दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी काही समाजकंटकांनी किल्ल्याच्या महादरवाज्यावरील फलक तोडून टाकला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. सदर घटनेचे फोटो आणि फुटेज प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
याबाबतची घटना अशी की, रत्नदुर्ग किल्ला महादरवाजाजवळ हनुमान मंदिराचे बाजूला महादरवाजा असे लिहिलेला फलक दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी रत्नागिरी नगरपरिषद रत्नागिरी यांची परवानगी घेऊन लावण्यात आलेला होता. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य रत्नागिरी विभागाचे तन्मय जाधव यांनी तक्रारदार दिपेश वारंग ( गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान) यांना फोन करून रत्नदुर्ग किल्ला महादरवाजा जवळ हनुमान मंदिराचे बाजूला लावण्यात आलेला महादरवाजाचा फलक दोन अज्ञात इसमानी काढून त्याचे नुकसान केलेले आहे, असे कळवले. त्यावरून दिपेश वारंग यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता, वरील दोन अज्ञात इसम यांनी रत्नदुर्ग किल्ला महादरवाजा जवळ हनुमान मंदिराचे बाजूला लावण्यात आलेला महादरवाजाचा फलक तोडून ते नुकसान केलेले असल्याचे समजले. सदरचा प्रकार हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा उद्देशाने केलेला असण्याची शक्यता असल्याने, या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये साधारण १८ ते २५ वयोगटातील दोन उंच तरुण, त्यातील एक निळा शर्ट व काळी पॅन्ट असे कपडे परिधान केलेला असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत असल्याचे म्हटले आहे.
एकीकडे महाराष्ट्र शासन गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलत आहे, तर दुसरीकडे काही समाजकंटक अशा प्रकारच्या अशोभनीय, संतापजनक आणि गडकिल्ल्यांच्या अस्मितेला ठेच पोहोचवणाऱ्या कृती करत आहेत. नीच प्रवृत्तीची माणसे अशी कृत्य करत आहेत. गडकिल्ले हा फक्त दगड-मातीचा ढीग नाही, तर तो आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा मानबिंदू आहे. अशा घटनांनी केवळ एक फलक नाही, तर गडकिल्ल्यांच्या रक्षणासाठी झटणाऱ्या सेवकांसह देशप्रेमी समाजाच्या मनावर घाव घातला आहे.
महाराजांच्या महाराष्ट्रात गडकिल्ले खरंच सुरक्षित आहेत का? हा गंभीर प्रश्न आज ऐरणीवर आला आहे. या प्रकाराची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान आणि सर्व शिवभक्त संघटितपणे मोठे आंदोलन उभारतील असा इशारा संस्थेचे संस्थापक श्री योगेश शामकांत सोनवणे यांनी दिला आहे.