(चिपळूण)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन 1960नंतर दलित साहित्य प्रवाह पुढे आला. राष्ट्रपाल सावंतही याच वाटेवरचे प्रवासी. त्यांनी विद्रोहाचे रूपांतर विद्व्ेषात केले नाही, त्यांचा लढा व्यक्तीशी नाही, तर व्यवस्थेशी आहे. त्यांच्या लेखनातून, कवितांतून परिवर्तन, शिक्षण आणि बाबासाहेबांचा विचार दिसतो. गतस्मृतींची गजबज या पुस्तकातील रोज एक प्रकरण शाळेतील मुलांना वाचून दाखवलं, तर वेगळ्या मूल्य शिक्षणाची गरज नाही. आपला शिक्षक कोणत्या संघर्षातून पुढे आला आहे, हे सहजपणे विद्यार्थ्यांना समजेल. जलसाकार, कवी, लेखक, विविध संस्थांवर काम करणारे शिक्षक राष्ट्रपाल सावंत हे केवळ शिक्षक नाहीत, तर समाज शिक्षक आहेत, असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष व कोमसापाच्या पुणे शाखेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा चिपळूणच्यावतीने कवी, लेखक राष्ट्रपाल सावंत यांच्या गतस्मृतींची गजबज या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी शहरातील शिक्षक पतपेढीच्या सभागृहात पार पडले. साहित्यिक, कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संस्कृती प्रकाशन पुणेच्या प्रकाशिका सुनिताराजे पवार, चिपळूण तालुका हितसंरक्षक समिती मुंबई कमिटीचे अध्यक्ष विठोबा पवार, ज्येष्ठ साहित्यिक अप्पा जाधव, अनिलकुमार जोशी, लेखिका निलाताई जाधव, माजी सभापती शौकत मुकादम, चिपळूण नगर पालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, गुहागरातील ज्ञानरश्मी वाचनालयाचे राजेंद्र आरेकर, आंबेडकर वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुनिल खेडेकर, आनंद घोडके, संतोष गोणबरे, विनय माळी, श्रीकृष्ण शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, कवी अरुण इंगवले, आरपीआयचे राजू जाधव, संत साहित्याचे अभ्यासक धनंजय चितळे, शशिकांत सकपाळ, चिपळूण तालुका हितसंरक्षक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, शिक्षक प्रतिनिधी संचालक अमोल भोबस्कर, संतोष कांबळे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी यू. व्ही. सदामस्त आदी उपस्थित होते.
प्राध्यापक मिलिंद जोशी पुढे बोलताना म्हणाले, बाबासाहेबांनी संविधानात मांडलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता हे अधिकार अधिक ठळकपणे लोकांसमोर गेले पाहिजेत. जाती-पातीत समाज विभागाला जात आहे. ही जाती-पातीची ओळख राजकारण्यांनी अधिक गडद करून स्वतःची पोळी भाजून घेतली आहे. खरंतर स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपण जाती-पाती बाजूला ठेवून एकपणाने लढलो. आता पुन्हा या उलट करतोय, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करताना जगभरातील अनेक धर्मांचा तौलनिक अभ्यास केला. त्यांनी धर्माला धम्म असे म्हटले आहे. याच विचारांच्या वाटेवरून राष्ट्रपाल सावंत जाताना दिसतात. त्यांच्या गतस्मृतीची गजबज या आत्मकथनामध्ये कुठेही आत्मसमर्पण, आत्मप्रौढीपण दिसत नाही. कणभर मदत करणाऱ्या माणसाविषयी ते मनभर कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांच्यातील कृतज्ञता मूल्य यातून सहजपणे दिसून येतं, असेही मिलिंद जोशी म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी आजच्या पुस्तक प्रकाशनाची जबाबदारी प्रकाश देशपांडे, अरुण इंगवले घेतात, सुनिताराजे पवार हे पुस्तक प्रकाशन करतात, आसावरी जोशी यांचा आशाताईंबद्दल बोलताना कंठ दाटून येतो. शौकत मुकादम या कार्यक्रमाला हजेरी लावतात, यावरूनच आजचा कार्यक्रम समतेचा संदेश देणारा आहे. यापेक्षा वेगळी समता काय पाहिजे, असा सवालही त्यांनी विचारला. राष्ट्रपाल सावंत यांनी शिक्षक म्हणून आपलं काम प्रामाणिकपणे केलं, परंतु कला, साहित्य अशा विषयातही त्यांनी मोठे योगदान दिलं आहे. त्यांनी एक नाही, तर शंभर पुस्तकं लिहावीत, कारण त्यांच्या लिखाणात वास्तव आहे, असेही डॉ. तानाजीराव चोरगे म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंजली बर्वे यांनी प्रास्ताविक केले. मुलांना शिकविताना समाजासाठी धडपडणारा हा माणूस खऱ्या अर्थाने चळवळ्या माणूस आहे, असे त्यांनी राष्ट्रपाल सावंत यांची ओळख करून देताना सांगितले. त्यांना समाजाबद्दल, आपल्या विद्यार्थ्यांबद्दल आत्मीयतेची जाणीव आहे, असेही त्यांनी नमूद केले.
आसावरी देशपांडे-जोशी व संदेश पवार यांनी गतस्मृतीची गजबज पुस्तकाचा परिचय करून दिला. श्री. पवार यांनी दलित साहित्याचा आढावा घेतला. आसावरी जोशी यांनी अत्यंत मार्मिक शब्दात या पुस्तकाची ओळख करून दिली. राष्ट्रपाल सावंत यांच्या स्वभावात कुठेही कडवटपणा नाही. या पुस्तकात ते सर्वांचा उल्लेख करतात. आपली आई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी ते ऋण व्यक्त करतात. ते आपला संघर्ष रंगवून सांगत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून झेप घेऊन ते पुढे येतात. वैयक्तिक दुःख चव्हाट्यावर ते मांडत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे ते स्वतःच्या दुःखाचं गाणं करू शकले, त्यामुळे शाहीर म्हणूनही ते नावारूपाला आले. स्वतःच्या दुःखाचं गाणं करणं, ही सोपी गोष्ट नाही. वेदनेला त्यांनी प्रबोधनाचा स्वर दिला, असे सांगत त्यांच्या पत्नी अशाताई सावंत या केवळ त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या नाहीत, तर ठामपणे उभ्या राहिल्या, असेही त्यांनी नमूद केले.
लेखक राष्ट्रपाल सावंत यांनी, मी सर्वांचा कधी झालो हे मला कळलंच नाही, असे सांगितले. माझी जात कधी कोणी विचारली नाही. सर्वांनी माझ्यावर मुलासारखी माया केली, असं सांगितलं. माझ्या आयुष्यात, माझ्या जडणघडणीत माझ्या दादाचा मोलाचा वाटा होता. दहावी झाल्यानंतर दादाने मला मुंबईत नेलं. मासिक 700 रुपयांची नोकरी होती, परंतु ती नोकरी सोडायला लावून मला दीडशे रुपयांची नोकरी करायला लावली. यातून दादाचा दूरदृष्टीपणा दिसत होता. मी सातशे रुपयांची नोकरी केली असती, तर मी शिक्षक झालो नसतो. पुढे शिकलो नसतो आणि आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करू शकलो नसतो, असेही त्यांनी सांगितले. माजी सभापती शौकत मुकादम यांनीही या वेळी आपलं मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखक धीरज वाटेकर यांनी केले, तर आभार आंबेडकर वाचनालयाचे संचालक प्रदीप पवार यांनी मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.