(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील कोकण नगर परिसरात असलेल्या मार्केटवर नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून अचानक मोठ्या बंदोबस्तात धडक कारवाई सुरू करण्यात आली. जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत असल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला होता. गाळेधारक व व्यावसायिक आपल्या गाळ्यातील महत्त्वाचे व मौल्यवान साहित्य वाचवण्यासाठी धावपळ करू लागले होते.
कारवाईदरम्यान प्रशासन आपली भूमिका ठामपणे मांडत असतानाच नौसीन काझी यांनी या ठिकाणी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांच्या मध्यस्थीमुळे ही कारवाई काही काळासाठी थांबवण्यात आली. अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे गाळ्यांमध्ये असलेले महागडे व अत्यावश्यक साहित्य हलवण्यासाठी वेळ न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. कारवाई स्थगित झाल्याने गाळेधारकांना आपले साहित्य सुरक्षितरीत्या स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक वेळ मिळाला असून, त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक वर्गात मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नौसीन काझी यांनी वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेवर येणारे संकट टळल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून, सर्व स्तरातून त्यांच्या भूमिकेचे कौतुक करण्यात येत आहे.

