( मुंबई )
अनेक वर्षांपासून गुगल वापरकर्त्यांना थर्ड पार्टी ईमेल आयडी असल्यास अकाउंटचा ईमेल पत्ता बदलण्याची मुभा देत होते. मात्र @gmail.com असलेल्या ईमेल पत्त्यांसाठी ही सुविधा उपलब्ध नव्हती. आता ही मर्यादा संपणार असून, लवकरच Gmail वापरकर्त्यांना स्वतःचा @gmail.com ईमेल पत्ता बदलण्याची संधी मिळणार आहे.
गुगलच्या सपोर्ट पेजवर जीमेल पत्ता बदलण्याची नवी प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही सुविधा सध्या हळूहळू सर्व वापरकर्त्यांसाठी रोलआउट केली जात आहे. विशेष म्हणजे ही माहिती सध्या फक्त हिंदी भाषेतील सपोर्ट पेजवर उपलब्ध असून, इंग्रजी वापरकर्त्यांना अजून ती दिसत नाही. हे अपडेट सर्वप्रथम “Google Pixel Hub” या टेलिग्राम ग्रुपमध्ये आढळून आले आहे.
प्रोटॉन मेल, आउटलुक यांसारख्या ईमेल सेवा आधीपासूनच ईमेल एलियास बदलण्याची सुविधा देत होत्या. मात्र गुगलने आजवर ही मुभा दिली नव्हती. आता गुगलच्या सपोर्ट डॉक्युमेंटमधून स्पष्ट झाले आहे की, वापरकर्ते त्यांचा जुना @gmail.com पत्ता नवीन @gmail.com पत्त्याने बदलू शकतील.
गुगलनुसार, ईमेल पत्ता बदलल्यानंतर जुन्या पत्त्यावर येणारे सर्व मेल्स नव्या इनबॉक्समध्ये येत राहतील. लॉगिनसाठीही नवीन पत्ता वापरता येईल. अकाउंटमधील फोटो, ईमेल्स, मेसेजेस किंवा इतर डेटा यावर कोणताही परिणाम होणार नाही.
ईमेल पत्ता बदलल्यानंतर काय होईल?
- जुना Gmail पत्ता एलियास म्हणून सेट होईल.
- जुन्या आणि नवीन दोन्ही पत्त्यांवर ईमेल मिळतील.
- जुन्या पत्त्याचा वापर करून ईमेल पाठवता येतील.
- कॅलेंडर इव्हेंट्स आणि जुन्या नोंदींमध्ये जुना पत्ता दिसत राहील.
मर्यादा आणि नियम:
- एकदा बदल केल्यानंतर १२ महिन्यांपर्यंत नवीन पत्ता बदलता किंवा डिलीट करता येणार नाही.
- जुना पत्ता पुन्हा वापरता येईल, मात्र त्यावर नवीन Gmail अकाउंट तयार करता येणार नाही.
- एका अकाउंटमध्ये जास्तीत जास्त ३ वेळा बदल करता येतील, म्हणजे एकूण ४ Gmail पत्ते.
- जुना पत्ता कायम त्या वापरकर्त्याचाच राहील, तो दुसऱ्या कोणालाही दिला जाणार नाही.
ही सुविधा सध्या पूर्णपणे लाईव्ह झालेली नसली तरी हिंदी सपोर्ट पेजवर तिची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. लवकरच गुगलची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सुविधा उपलब्ध झाल्यानंतर वापरकर्ते “My Account” सेक्शनमधून Gmail पत्ता बदलू शकतील.
जुनं यूजरनेम बदलायचं असलेल्या लाखो Gmail वापरकर्त्यांसाठी हा बदल मोठा दिलासा ठरणार आहे. मात्र हा अपडेट टप्प्याटप्प्याने दिला जात असल्याने सर्वांना तो लगेच मिळेलच असं नाही.

