(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आता सी प्रहरी इलेक्ट्रिक सायकलची गस्त सुरू राहणार आहे. त्यामुळे गणपतीपुळे पर्यटन स्थळाला पोलिसांचे सुरक्षा कवच प्राप्त झाले असून येथील पर्यटन अधिक सुरक्षित झाले आहे. गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या वतीने जीवरक्षक कार्यरत ठेवण्यात आले आहेत. या जीवरक्षकांकडून समुद्र किनाऱ्याची सुरक्षा ठेवली जात आहे. परंतु आता याच जीवरक्षकांच्या जोडीला गणपतीपुळे पोलिसांची गस्त सुरू राहणार असल्याने समुद्रकिनाऱ्यावरची सुरक्षा अधिक भक्कम होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
गणपतीपुळे पर्यटन स्थळाला सुमारे चार किलोमीटरचा विस्तीर्ण व विलोभनीय समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे विस्तीर्ण स्वच्छ आणि सुंदर अशा समुद्रकिनाऱ्यावर आता सी प्रहरी इलेक्ट्रिक सायकलची गस्त राहणार असल्याने पर्यटनाला मोठे सुरक्षा कवच निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून गणपतीपुळे समुद्र किनारी गस्तीकरिता दोन इलेक्ट्रिक सायकल गणपतीपुळे पोलीस ठाण्याला प्राप्त झाल्या आहेत. या सायकल समुद्रकिनाऱ्याच्या वाळूतून सहज फिरू शकतात. त्यामुळे गणपतीपुळे पोलिसांची समुद्रकिनाऱ्यावरील गस्त अधिक व्यापक बनली आहे.
सध्या गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच गणपतीपुळे पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांच्या जोडीला कार्यरत असलेले होमगार्ड सुद्धा या इलेक्ट्रिक सायकलने गणपतीपुळे समुद्रकिनारी गस्त घालत असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरची सुरक्षा अधिक भक्कम बनली आहे. या समुद्रकिनाऱ्यावर कोणतीही दुर्घटना घडल्यास घडल्यास आता सहजगत्या या इलेक्ट्रिक सायकलने पोलिसांना पोहचता येणार आहे. एकूणच या सी प्रहरी इलेक्ट्रिक सायकलमुळे संपूर्ण गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांची विशेष करडी नजर राहणार असल्याने समुद्रकिनाऱ्यावरील संशयास्पद हालचाली तसेच समुद्रात खोल अंतरावर पोहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांवर विशेष लक्ष केंद्रित करणे शक्य झाले असल्याचे मत व्यक्त होत आहे.