नाशिक (प्रतिनिधी): सशक्त राष्ट्र निर्मितीसाठी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर दि. १ मे २०२५ रोजी राष्ट्रीय मूल्यसंस्कार मेळावा तथा महासत्संग सोहळा,विश्वविक्रमी विद्यारंभ व गुरु- मातृ- पितृ पाद्यपूजन सोहळा तसेच १ कोटी महावृक्षारोपण अभियानांतर्गत वृक्ष व बीज स्वरूपी प्रकृती पूजन आणि वृद्धाश्रममुक्त भारत अभियान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. परमपूज्य गुरुमाऊली श्री.आण्णासाहेब मोरे यांच्या पावन उपस्थित हा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत असून १ मे रोजी महाराष्ट्र दिनी संपूर्ण दिवसभर गोल्फ क्लब मैदानावर बहुविध उपक्रम घेण्यात येणार आहेत अशी माहिती अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांनी दिली.
कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करताना ते म्हणाले की,दि. १ मे रोजी मैदानाभोवती सकाळी साडेआठ वाजता संदेश यात्रा काढण्यात येईल. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत मूल्य संस्कार ज्ञानदालनाचा शुभारंभ होईल. प्रत्येकाने आवर्जून भेट देऊन पाहणी करावी असे मूल्यसंस्कार ज्ञान दालन असणार आहे. या ज्ञानदानात ऋषीमुनींच्या वेद-विज्ञान संशोधनाचे सादरीकरण, सात्त्विक आहार आणि निरोगी आरोग्य या विषयी मार्गदर्शन, पालक-पाल्य यांच्यासाठी समुपदेशन, युवकांसाठी व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा करिअर व विविध नोकरीच्या संधीवर मार्गदर्शन, दहावी, बारावी, पदवीनंतर करिअरच्या संधी विषयी मार्गदर्शन, सणवार व्रत उत्सव यांचे वैज्ञानिक आणि शास्त्रीय महत्त्व यांचे सादरीकरण, दुर्ग संवर्धन अभियान आणि इतिहासकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, पारंपरिक खेळांचे महत्त्व व सादरीकरण, नक्षत्र व परसबाग संकल्पना, गर्भसंस्काराचे महत्व, मुलांचा सर्वांगीण विकास आणि पंचेंद्रिय विकासावर मार्गदर्शन, आजीबाईच्या बटव्याचे महत्त्व, भारतीय कायदेविषयक सोप्या भाषेत माहिती आणि सेवामार्गातील सामाजिक उपक्रमाचे सादरीकरण आणि मांडणी यांचा समावेश असणार आहे.
सकाळी दहा वाजता पालकत्व एक कला या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चासत्र होईल. दुपारी बारा वाजता स्पर्धा परीक्षा करिअर वर तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करतील. दुपारी ३:३० ते सायंकाळी ५ या वेळेत विश्वविक्रमी विद्यारंभ व गुरु- मातृ-पितृ पाद्यपूजन सोहळा, १कोटी महावृक्षारोपण अभियानांतर्गत वृक्ष व बीज स्वरूपी प्रकृती पूजन आणि वृद्धाश्रममुक्त भारत अभियान सोहळा संपन्न होईल. त्यानंतर सायंकाळी ५:३० वाजता परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांचे अमृततुल्य हितगुज होईल अशी सविस्तर माहिती गुरुपुत्र श्री. मोरे यांनी दिली.
कार्यक्रमस्थळी समुपदेशन सत्र
मूल्यसंस्कार मेळाव्यानिमित्त कार्यक्रमस्थळी सकाळी नऊ वाजल्यापासून गर्भवती माता, भगिनी, विद्यार्थी पालकांच्या विविध प्रश्नांवर विनामूल्य मार्गदर्शन, समुपदेशन (प्रश्नोत्तरे) सत्र घेण्यात येणार आहे.या उपक्रमाचाही संबंधितांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. नितीनभाऊ मोरे यांनी केले.