(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धजन पंचायत समितीच्या पंचशील बुद्ध विहार येथे प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २३२९ वी जयंती शनिवार दिनांक ५ एप्रिल रोजी समितीचे सल्लागार किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. यावेळी विचार मंचावर सभापती प्रकाश भागुराम पवार, सेक्रेटरी सुभाष बाबू पवार, बौद्धाचार्य संघमित्रा दिनेश पवार, सुप्रिया सुभाष पवार, वक्ते किशोर पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमेसमोर युवती व बौद्धांचार्या संघमित्रा दिनेश पवार, सुप्रिया सुभाष पवार, सभापती प्रकाश पवार, सेक्रेटरी सुभाष पवार, किशोर पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर सामुदायिक त्रिशरण पंचशील व संपूर्ण धार्मिक पूजापाठ घेण्यात आला. त्यानंतर सल्लागार किशोर पवार यांनी चक्रवर्ती सम्राट अशोक एक कर्तृत्ववान राजा, कार्यक्षम अनुशासन, लोक कल्याणकारी राज्य कारभार याबाबत माहिती दिली.चक्रवर्ती सम्राट अशोक राजाने अनेक शिलालेख,स्तंभलेख, हजारो स्तुप, विहारे, लेण्यांची निर्मिती केली.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकाचे कार्य विजयादशमीचे महत्त्व लोकांना समजावे म्हणून १९५६ साली सम्राट अशोक विजयादशमी दिनी धम्म चक्र प्रवर्तन केले, याबाबत सविस्तर माहिती दिली. भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा अभ्यास करून आजच्या युवक युवतींनी आपले जीवनमान उंचावण्यासाठी त्यांचं विचार आचरणात आणावे असे आवाहन किशोर पवार यांनी केले.