(लांजा / रत्नागिरी)
लांजा तालुक्यातील वेरवली-बुद्रुक येथील लाडवाडी-रामगाव परिसरात वृद्ध महिलेचा खून करून सोन्याचे दागिने लुटल्याच्या गंभीर प्रकरणातील संशयित आरोपी प्रमोद खेडेकर याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. या गुन्ह्याचा लांजा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत छडा लावला होता. आता पुढील तपासाच्या दृष्टीने आरोपीची पोलीस कोठडी कायम ठेवण्यात आली आहे.
लांजा तालुक्यातील वेरवली-बुद्रुक येथील लाडवाडी परिसरात १९ ऑक्टोबर रोजी चोरीच्या उद्देशाने वृद्ध महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. वृद्ध महिलेचा खून करून सोन्याचे दागिने लंपास करण्यात आल्याने पोलिसांसमोर या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आव्हान होते. या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना लांजा पोलिसांनी संशयित प्रमोद खेडेकर याला ताब्यात घेतले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या १२ तासांत गुन्ह्याची उकल केली. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
मंगळवारी, २७ ऑक्टोबर रोजी आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील अधिक तपास लांजा पोलीस करीत असून, गुन्ह्याशी संबंधित पुढील बाबींचा तपास सुरू आहे.


