(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुका धम्मक्रांती कला मंचातर्फे कोट्यवधी भारतीयांची प्रेरणास्थान व त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त जाकादेवी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माता रमाई यांच्या जीवनकार्याला अभिवादन करण्यासाठी गीतगायनाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेला हा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात रत्नागिरी तालुक्यातील विविध शाखांमधील सुमारे २० हून अधिक जलसाकार ग्रुप तसेच अनेक वैयक्तिक कलाकारांनी सहभाग घेतला. सुमधूर वाद्यांच्या तालावर माता रमाई यांच्या त्यागमय जीवनावर आधारित प्रेरणादायी गीतांचे सादरीकरण करण्यात आले. गीतगायनातून सामाजिक समता, स्त्रीशक्ती आणि संघर्षाची मूल्ये प्रभावीपणे मांडली गेली.
कार्यक्रम कला मंचाचे उपक्रमशील अध्यक्ष, कवी, गायक व संगीतकार रविकांत सोनू पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी उपाध्यक्ष सुरेश कांबळे, ज्येष्ठ सल्लागार व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश रा. पवार, भगवान जाधव, अनिल पवार, कवयित्री ज्योती पवार, ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या राजश्री कांबळे, खालगावचे सरपंच प्रकाश खोल्ये, सचिव सतीश कदम, उपसचिव प्रशांत जाधव, कार्याध्यक्ष मिलिंद कांबळे, प्रसिद्धी प्रमुख संतोष पवार, संभाजी भोसले यांच्यासह तालुक्यातील अनेक ज्येष्ठ कवी, गायक, संगीतकार आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी धम्मक्रांती कला मंचातर्फे रत्नागिरी तालुक्यातील फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत विविध कलामाध्यमांतून धम्म चळवळीचा निष्ठेने प्रचार व प्रसार करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच तालुक्यातील दिवंगत कलाकारांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या कुटुंबीयांना मान्यवरांच्या हस्ते मरणोत्तर सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
माता रमाई जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात अध्यक्ष रविकांत पवार यांच्यासह मान्यवरांनी माता रमाई यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कला मंचाची दूरदृष्टी, सामाजिक जाणीव आणि कलाकारांना नवी ऊर्जा देण्याचा संकल्प याबाबत अनेक वक्त्यांनी गौरवोद्गार काढले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धम्मक्रांती कला मंचाचे सर्व पदाधिकारी, सल्लागार, संघटक, तसेच जाकादेवी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन स्मारक समितीचे पदाधिकारी व देणगीदार यांनी मोलाचे सहकार्य केले. हा कार्यक्रम सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचा प्रेरणादायी संगम ठरला.

