(चिपळूण)
टेरव गावात थेट जनतेतून सरपंचपदी विजयी झाल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, खासदार नारायण राणे आदींच्या सहकार्याने विविध विकास योजना मंजूर झाल्या. मात्र जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी बेळेत शासनाकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा न केल्याने कामे प्रलंबित राहिली असून याबाबत चौकशीच्या मागणीसाठी १४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सरपंच किशोर कदम यांनी दिला आहे.
कदम यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, टेरवमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी शासनाने समिती स्थापन केली. मात्र गेल्या दोन वर्षात जिल्हाधिकाऱ्यांनी या समितीच्या बैठकीचे आयोजन केलेले नाही. जल जीवन मिशन अंतर्गत टेरव, टेरव बुद्रुक तसेच वेतकोंड स्वतंत्र नळपाणी योजनेच्या कामाला दोन वर्षात न्याय मिळालेला नाही. सौर दिव्यांचा प्रस्तावही अपूर्ण आहे. मौजे टेरव येथे वन विभाग स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान निधी अभांवी प्रलंबित आहे.
विकासात अडथळे निर्माण करणाऱ्यांना झुकते माप
टेरव गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याऐवजी तक्रारदार व विकासात अडथळे निर्माण करणाऱ्यांना प्रशासनाकडून झुकते माप दिले जाते. गावातील गावातील विविध योजनांसाठी ग्रामपंचायतीकडून परिपूर्ण प्रस्ताव देवूनही प्रशासन गांभीर्याने दखल घेत नाही. टेरव देवस्थानाकरिता ‘अ’ दर्जा मिळाला नाही, असे सरपंच कदम यांनी निवेदनात नमूद केले आहे. याकामी वन विभागाच्या सचिवांना मंजुरी बाबत आदेश व्हावेत, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र बैठक घ्यावी, पाझर तलावाचे सर्वेक्षण होण्यासाठी पाटबंधारे विभाग यांना आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.