(रत्नागिरी)
तालुक्यातील नाखरे-खांबडवाडी येथे झालेल्या अपघात प्रकरणी ‘त्या’ मोटार चालकाविरुद्ध पावस सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत अविनाश खाके (वय २८, रा. नाखरे, कालकरकोंड, रत्नागिरी) असे संशयित मोटार चालकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २६) दुपारी सव्वादोनच्या सुमारास खांबड फाटा ते नाखरे कालकरकोंड जाणाऱ्या रस्त्यावर खांबडवाडी येथे घडली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित खाके हे मोटार (क्र.एमएच-४७ एबी २१९४) ही कालकर कोंड नाखरे ते पावस अशी घेऊन येत असताना निष्काळजीपणे मोटार चालवून पावसहून येणाऱ्या इलेक्ट्रीक दुचाकी (क्र. एमएच-०८ बीजी २९१६) वरिल चालक चंदवदन शैलेद्र शिंदे-दसुरकर (वय २९, रा. उंबरवाडी, नाखरे, रत्नागिरी) ठोकर देवून अपघात केला. या अपघातात स्वार चंद्रवदन शिंदे-दसुरकर यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस हवालदार ललित देऊसकर यांनी पावस पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.