(चिपळूण)
अंगणात खेळत असलेल्या ९ वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून शेजाऱ्याने घरी नेऊन तिच्यावर अमानुष बलात्कार केला असल्याची तक्रार मुलीच्या आईने सावर्डे पोलिस स्थानकात दिली होती. या तक्रारीवरून संबंधित ५२ वर्षीय प्रौढाला सावर्डे पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. अत्यंत संताप आणणाऱ्या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील एका गावात चार दिवसांपूर्वी ही घटना घडली. मुलीचे आई-वडील कामाला गेल्याची संधी साधून या नराधमाने छोट्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरी बोलावले आणि हे कुकर्म केले. कुणाला काही न सांगण्याची तिला धमकीही दिली. आपल्या मुलीला त्रास होत असल्याचे मुलीच्या आईला समजल्यानंतर तिने तिची विचारपूस केली आणि मुलीने धक्कादायक प्रकार आईला सांगितला.
आईने तत्काळ सावर्डे पोलिस स्थानकात जाऊन संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सावर्डे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक आबासाहेब पाटील यांनी तत्काळ हालचाल करून त्याला गजाआड केले. त्याला न्यायालयात हजर केले असता, पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.