(चिपळूण)
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नजीर जुवळे आणि चिपळूणची सुकन्या डॉ. नर्गिस जुवळे यांचे सुपुत्र डॉ. नवीद जुवळे यांनी मार्च २०२५ मध्ये मुंबई येथील सुप्रसिद्ध केईएम रुग्णालयातून डीएम कार्डिओलॉजी ही अत्यंत प्रतिष्ठित पदवी अत्युच्च गुणवत्तेने प्राप्त केली आहे. डॉ. नवीद यांचा बालपणापासूनच वडिलांसारखा हृदयरोगतज्ज्ञ बनण्याचा मानस होता. आपल्या अभ्यासू वृत्तीने आणि प्रचंड मेहनतीने डॉ. नवीद यांनी अंडर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, सुपर स्पेशलायझेशन हे तिन्ही शैक्षणिक टप्पे स्वतःच्या गुणवत्तेने आणि चिकाटीने पूर्ण केले.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ज्या केईएम रुग्णालयातून वडील डॉ. नजीर जुवळे यांनी ४० वर्षापूर्वी आपले शिक्षण पूर्ण केले त्याच केईएएम संस्थेत डॉ. नवीद यांना प्रवेश मिळाला आहे. डॉ. नवीद हे चिपळूणचे माजी नगराध्यक्ष अब्दुल कादीर मुकादम तसेच कडवईचे इस्माईल जुवळे यांचे नातू व पद्मश्री कॅप्टन फकीर मोहम्मद जुवळे यांचे पणतू आहेत. ज्याप्रमाणे डॉ. नजीर जुवळे गेली ४० वर्ष नियमितपणे दर महिन्याला चिपळूण येथे येऊन गरजू रुग्णांची सेवाभावी तपासणी करत आहेत, ती परंपरा डॉ. नवीद यांनी पुढे चालू ठेवावी, अशी अनेकांची इच्छा आहे.