(दापोली)
जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण या दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षणाचे नियोजन श्री मंगल कार्यालय, दापोली या ठिकाणी दिनांक २ ते ५ जून या दरम्यान आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणाच्या दरम्यान आजच्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लेखिका व पर्यावरण तज्ज्ञ श्रीमती अर्चना गोडबोले व पंचायत समिती दापोलीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीम. अर्चना गोडबोले यांनी, ‘पर्यावरण दिन हा केवळ उत्सव म्हणून साजरा न करता त्याची चळवळ उभी करून पर्यावरणाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे’ असे प्रतिपादन केले. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी जंगलाचे संवर्धन केले पाहिजे त्यासाठी लोकांनी मानसिकतेमध्ये बदल केला पाहिजे असे मत व्यक्त केले.
यावेळी श्रीमती गोडबोले, यांच्या हस्ते ज्या ग्रामपंचायतीमधील योजना ” हर घर जल” म्हणून घोषित झालेली आहेत व त्या योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण झालेल्या आहेत अशा ग्रामपंचायतींना वड, पिंपळ, कडुलिंब, अशोक, यासारख्या रोपांचे वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संसाधन केंद्राचे समन्वयक मंगेश नेवगे यांनी केले.

