(रत्नागिरी)
ना. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री व वित्त आणि नियोजन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते सोमवार दि. १७.०३.२०२५ रोजी रत्नागिरी शहरातील विकासकामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करणेत आला होता. सदर कार्यक्रमादरम्याने ना. अजितदादा पवार यांनी बँकेला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांचे समवेत नाम.डॉ. उदयजी सामंत, खा. सुनिलजी तटकरे, आम. शेखरजी निकम, जिल्हाधिकारी श्री. देवेंद्रजी सिंग उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना बँकेचे उपाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव यांनी केली. प्रस्तावनेदरम्यान उपाध्यक्ष यांनी वित्त मंत्री यांनी बँकेला भेट दिली, ही बाब बँकेकरीता भूषणावह असल्याचे नमूद केले. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी अजितदादा यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन आदरपूर्वक सत्कार केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा देखील बँकेचे अध्यक्ष महोदय यांचे हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणेत आला. तद्नंतर नाम. अजितदादा पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांचेबद्दल गौरवोद्गार काढून, बँकेच्या सभासदांना ३०% लाभांश देणारी देशातील पहिली बँक असल्याचे तसेच बँकेच्या ठेवी, कर्जव्यवहार या गोष्टींचे अवलोकन करून बँकेची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे त्याचप्रमाणे राज्यातील पहिल्या पाच बँकांमध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश असल्याचे सांगितले. आपले अनुभव कथन करताना अजितदादा यांनी पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी ७ वर्षे कामकाज केल्याचे सांगून, राज्य सहकारी बँकेमध्ये स्व. गोविंदरावजी निकम साहेब यांचे समवेत कामकाज केल्याचे आग्रहाने नमूद केले. बँक राज्यामध्ये अग्रेसर होण्यासाठी डॉ. चोरगे यांचेसारखे अभ्यासू, चांगला उद्देश ठेऊन, आपल्या तत्वाशी बँक हिताकरिता कोणतीही तडजोड न करता आणि बँकेला पूर्ण वेळ देणारे नेतृत्व मिळाल्यामुळे तसेच बँकेच्या सर्व संचालकांना विश्वासात घेऊन चांगले निर्णय घेतल्यामुळे, राज्यातील ५ अग्रगण्य जिल्हा बँकांमध्ये रत्नागिरी जिल्हा बँकेचा समावेश झालेला आहे आणि त्यामुळेच राज्य सरकारने शासकीय निधी ठेवण्याकरिता मान्यता दिलेल्या १४ बँकांमध्ये रत्नागिरी जिल्हा बँकेचा समावेश करण्यात आलेला आहे.
आज राज्यातील इतर जिल्हा बँकांना योग्य नेतृत्व न मिळाल्यामुळे तसेच त्या बँकांनी चुकीचा कर्जव्यवहार केल्यामुळे त्या बँका डबघाईला आल्या आहेत. अशा जिल्हा सहकारी बँकांमुळे सहकाराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला आहे. काही अडचणीतल्या बँकांना शासन हमी देऊन, राज्य बँकेकडून अर्थसहाय्य देऊन, सक्षम करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न सुरू आहे.
रत्नागिरी जिल्हा बँकेला मिळालेले डॉ. चोरगे यांचेसारखे खंबीर नेतृत्व व सर्व संचालक मंडळाची साथ यामुळे पीक कर्जाना वाव नसताना तसेच ठेवी संकलनाकरिता मर्यादा असतानाही डॉ. चोरगे यांनी बँकेचा अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारताना रू. ८०० कोटी व्यवसाय असलेली बँक आज रू.५००० कोटी व्यवसायाकडे वाटचाल करीत असल्याबाबत कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नक्त एनपीए सलग १२ वर्षे ०%, सलग १४ वर्षे ऑडीट वर्ग ‘अ’ असल्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच शासनाच्या ठेवी बँकेकडे वळविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नाम, डॉ. उदयजी सामंत व बँकेचे संचालक व आम. श्री. शेखरजी निकम यांनी संबंधितांना सूचना द्याव्यात. तसेच जिल्हाधिकारी यांनीही यात लक्ष घालावे, असे सांगितले.
बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्याकडे बँकेचे अध्यक्ष पदाचा प्रदीर्घ अनुभव असून, सदर अनुभवातून सहकार चळवळ वृध्दींगत करताना काही सूचना त्यांनी केल्यास त्याचा शासन स्तरावरती निश्चितपणे विचार केला जाईल. याबाबत आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्यास तत्पर आहोत. बँकेच्या प्रगतीमध्ये बँकेचे संचालक, सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे योगदान असून, त्यांनी सर्वांचे अभिनंदन करून व बँकेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सदर कार्यक्रमासाठी बँकेचे सर्व संचालक मंडळ तसेच अधिकारी कर्मचारी व सहकारातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी बँकेचे उपाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.