( पुणे )
पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असतानाच, आता एका पाेलिस कर्मचाऱ्याने विश्रांतवाडी पाेलिस ठाण्याचे आवारात स्वत:चे बुलेट गाडीतील पेट्राेल एका कॅनमध्ये काढून आणत, स्वत:चे अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पाेलिस शिपाई विजय लक्ष्मण जाधव याच्यावर वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केल्याबद्दलचा ठपका ठेवत त्याचेवर निलंबन कारवाई केली आहे.
मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देणार्या पोलीस व त्याच्या सहकार्यांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत असल्याचे पाहून, आपलीही तक्रार दाखल करुन घ्यावी, यासाठी पोलिस अंमलदाराने पोलीस ठाण्यातच स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. गुन्हा दाखल झाल्याने पोलीस उपायुक्त डॉ संदीप भाजीभाकरे यांनी या पोलीस अंमलदाराला निलंबित केले आहे. त्यांची पोलीस मुख्यालयात आर कंपनीमध्ये सध्या नियुक्ती होती.
विशेष म्हणजे विश्रांतवाडी पोलिसांनी विजय जाधव यांचा भाऊ विकी लक्ष्मण जाधव यांची फिर्याद पोलिसांनी अगोदर घेतली ( गुन्हा रजि़ नं. ४०/२०२५) ती २३ फेब्रुवारी रोजी रात्री २३ वाजून ३७ मिनिटांनी दाखल करण्यात आली आहे. त्यात ओमकारसिंग गुलचंदसिंग भोंड, गुरदीपसिंग भोंड, जयदिपसिंग भोंड, गुरुबचन भोंड (सर्व रा. सह्याद्री कॉलनी, आनंद पार्क धानोरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डुकरे त्यांच्या जागेत ठेवण्याच्या कारणावरुन त्यांच्यात भांडणे होऊन जीवे मारुन टाकण्याची धमकी दिल्याचे त्यात म्हटले होते.
त्यानंतर मकारसिंग गुलचंद्रसिंग भोंड (वय ४५, रा. ओमकार निवास, सह्याद्री कॉलनी, आनंद पार्क, धानोरी) यांची फिर्याद (गु़ रजि़ नं. ४१/२०२५) घेण्यात आली. ही फिर्याद २४ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजून ०३ मिनिटांनी दाखल करण्यात आली आहे. त्यात विजय जाधव, विकी जाधव, विजय जाधव यांची बहिण व तिचे पती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार धानोरीतील सह्याद्री कॉलनी, २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडला होता.
ही भांडणे झाल्यानंतर दोन्हीही बाजूचे लोक विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात जमले होते. त्यावेळी पोलिसांनी ओंकारसिंग भोंड यांची फिर्याद घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी विजय जाधव यांनी आपलीही फिर्याद घ्यावी, याचा आग्रह करु लागले. त्याचवेळी त्यांनी बाहेर जाऊन गाडीतील पेट्रोल काढून आणले. माझी तक्रार घेतली नाही तर मी इथेच पेटवून घेईल, असे बोलून स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले. पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्यांनी त्यांना जागेवरच रोखले. त्यातून पुढील प्रसंग टळला. त्यानंतर विकी जाधव यांची अगोदर फिर्याद घेण्यात आली असून त्यानंतर त्यांच्या विरोधकांची फिर्याद घेण्यात आली. मात्र आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा अदखलपात्र गुन्हा विजय जाधव यांच्यावर नोंदविण्यात आला.
पोलीस अंमलदार विजय लक्ष्मण जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलाच्या दृष्टीने हे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार असून पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे व गंभीर गुन्हेगारी स्वरुपाचे असल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.