(रत्नागिरी)
सहा वर्षांपूर्वी शहरातील गाडीतळ येथे एसटी बस चालकाला मारहाण केल्याप्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयाने सोमवारी २ वर्षे कारावास व २,७०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
सचिन भिकाजी रायकर (४४, रा. गवळीवाडा, रत्नागिरी), महेंद्र महादेव फणसे व सिद्धेश अनंत धुळप अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना १० फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली होती. शहर एसटी बसचालक सतीश नरहरी पाडाळकर (४६, रा. पऱ्याची आळी, रत्नागिरी) हे रात्री काळबादेवी ते रत्नागिरी बसस्थानक अशी बस घेऊन येत होते. गाडीतळ येथे दुचाकीवरील तिघांनी ‘आमच्या अंगावर गाडी घालतोस काय,’ असे म्हणत बस थांबवली. बसचालक व तिघांमध्ये बाचाबाची झाली. तिघांनी बसचालकाला मारहाण केली.
या खटल्याचा सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अॅड. अनिरुद्ध फणसेकर यांनी काम पाहिले. पैरवी म्हणून पोलिस उपनिरीक्षक योगेश खोंडे व हवालदार साळवी, मोहिते यांनी काम पाहिले.