(रत्नागिरी)
खल्वायन रत्नागिरी या संस्थेची प्रतिवर्षांप्रमाणे दिवाळी पाडवा विशेष संगीत मैफल बुधवार दि. 22 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 ते 7.30 या वेळात आयोजित करण्यात आली आहे. मे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड चे प्रायोजकत्व लाभलेली ही मैफल यंदा सौ. गोदुताई जांभेकर विद्यालय ( हॉल), एस.टी. स्टँड समोर, रत्नागिरी येथे ही मैफल संपन्न होणार आहे.
मुग्धा गांवकर ही गोवा येथील युवा शास्त्रीय गायिका असून गांधर्व महाविद्यालयाची “विशारद” परिक्षा विशेष श्रेणीत ती उत्तीर्ण आहे. तसेच कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून ‘शास्त्रीय संगीतात एम. ए. -सुवर्ण पदक विजेती’ आहे. मुग्धा ला बी. कॉम. पदवी प्राप्त असून आकाशवाणीची शास्त्रीय,अभंग व नाट्यगीताची ती मान्यताप्राप्त कलाकार आहे.
सद्या तीचे भारतीय शास्त्रीय संगीताचे अध्यापन (विद्यादान) चालू आहे. अभिनव कला मंदीर या संस्थेचे ‘सचिव’ पद ती सांभाळत आहे. मुग्धा चे सुरवातीचे गायनाचे शिक्षण वयाच्या ६व्या वर्षापासून सौ.विजया नागराळी यांच्याजवळ ५ वर्षे झाले. नंतर श्री.दामोदर च्यारी यांच्याकडून ५ वर्षे मार्गदर्शन घेतले. नंतर ७ वर्षे डॉ.लक्ष्मीकांत सहकारी(पं.अभिषेकी बुवांचे शिष्य) यांच्याजवळ संगीताध्ययन तिने केले. गेली ७ वर्षे पुण्यात मेवाती घराण्याचे प्रसिद्ध गायक पं.संजीव अभ्यंकर (पं.जसराज यांचे पट्टशिष्य) यांच्याकडे तिचे विशेष अध्ययन सुरू आहे. दै.गोमन्तक तर्फे ‘गोमन्तक सा रे ग म’, गोवा युवा मंच’ तर्फे संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी “युवा गौरव पुरस्कार”.बालभवन, गोवा चा “गोमंत बालभूषण ‘ इत्यादि. पुरस्काराने ती सन्मानित आहे.
तसेच कला संस्कृती खाते, गोवा व पं.जसराज ट्रस्ट,पुणे तर्फे तिला शिष्यवृत्ती मिळालेली आहे. स्वरमंगेश संमेलन, गोवा नक्षत्रोत्सव-युवा संमेलन, श्रीमती अंजनीबाई मालपेकर स्मृती समारोह, काणकोण; स्वरसम्राज्ञी गिरिजाताई केळकर स्मृती संगीत संमेलन, फोंडा; तसेच शरदरंग महोत्सव, उदयपुर – राजस्थान ; युवा प्रतिभोत्सव, मध्यप्रदेश; संगीत अकादमी, दिल्ली; देवल क्लब, कोल्हापूर; स्वरसागर संगीत महोत्सव,पुणे; पं.बाबुराव बानावळी व पं.विश्र्वनाथ गडकर स्मृति संगीत संमेलन, कारवार-कर्नाटक; ताज टी फाउंडेशन; मुंबई; पं. वसंत देसाई युवा संगीत महोत्सव,कुडाळ; बॅनियन ट्री आयोजित युवा संगीत संमेलन, मुंबई, दिवाळी पहाट, बेळगाव; पाडवा पहाट, जळगाव; इ. अनेक संमेलनात तिचे शास्त्रीय गायन तसेच सुगम संगीताचेही कार्यक्रम सादर झालेले आहेत. प्राची जठार ह्या युवा गायिकेसोबत ‘स्वरसखी’ ह्या अनोख्या शास्त्रीय संगीत सहगायनाच्या मैफिली गोवा व गोव्याबाहेरही तिने सादर केल्या आहेत. गोमंतकीय महिला कलाकारांनी सादर केलेल्या ‘सं.कट्यार काळजात घुसली’ ह्या अजरामर अश्या संगीत नाटकामध्ये सदाशिव ची भूमिका तिने सादर करून त्या साठी तिला गोवा राज्यस्तरीय स्पर्धेत गायक नटाचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. अनेक ध्वनिमुद्रिकां मध्ये तिने गायन केले आहे. “मुग्धगंध” हा तिचा यू ट्यूब चॅनल आहे.
सदरहू मैफलीला हार्मोनियम व तबला साथसंगत रत्नागिरीचे प्रसिद्ध वादक श्री. चैतन्य पटवर्धन व श्री. प्रथमेश शहाणे हे करणार आहेत. तर तालवाद्य साथ श्री. सुहास सोहनी हे करणार आहेत. ही मैफल सर्व रसिकांना विनाशुल्क असून सर्व रसिकांनी मैफलीला उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन खल्वायन अध्यक्ष श्री. मनोहर जोशी यांनी केले आहे.

