( संगमेश्वर / प्रतिनिधी )
कोकणच्या निसर्गाची भुरळ केवळ पर्यटक, कवी आणि लेखकांनाच पडते असे नव्हे तर, येथील निसर्गाचं पावसाळ्यातील मनमोहक रुप पाहून चित्रकार देखील मोहित होतात. निसर्गातील या विविध छाटांचे दर्शन कलारसिकांना व्हावे म्हणून चिपळूण तालुक्यातील गांग्रई येथील निसर्गरम्य ठिकाणी दिनांक ०६ ते १३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत पुष्कर पर्यटन केंद्र येथे भारतातील सुमारे ४५ स्त्री-पुरुष चित्रकार कलाकार मंडळी कलाकृती साकारण्याचे काम करणार आहेत. ही सर्व कलाकार मंडळी पंजाब, चेन्नई, नागपूर, नाशिक, पुणे, कोकण विभाग मुंबई, कोल्हापूर, नवी मुंबई आदि ठिकाणाहून येणार आहेत. या कार्यशाळे दरम्यान कलारसिकांनी गांग्रई येथे भेट देवून नामवंत कलाकारांना कलाकृती साकारताना प्रत्यक्ष पाहावे असे आवाहन ज्येष्ठ चित्रकार- शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के आणि पुष्कर सदानंद चव्हाण यांनी केले आहे.
कोंकणातील निसर्गाच्या सान्निध्यात ही कलाकारांची मांदियाळी सर्वानाच प्रेरणादायक ठरणार आहे. आणि सर्वानाच म्हणजे कलाकारांना, कलारसिकांना, कलाविद्यार्थ्यांना एका वेगळयाच आनंदायक अनुभवाची अनुभूती देणार आहे. हे मात्र निश्चितच. या कार्यशाळेच्या कालावधीत कलारसिकांनी प्रत्यक्षात पुष्कर कृषी पर्यटन केंद्र गांग्रई येथे उपस्थित राहून आनंददायक अनुभूतीचा आस्वाद घ्यावा आणि कलाकृती साकारतानाचा आनंद लुटावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यशाळेच्या समाप्तीनंतर निवडक कलाकृतीचे प्रदर्शन मुंबईच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या कलादालनात जानेवारी २०२६ मध्ये कलाप्रदर्शन करण्यात येणार आहे. या कलाप्रदर्शनातून होणा-या विक्रीतून काही रक्कम रत्नागिरी जिल्हयातील काही सेवाभावी संस्थाना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काही प्रमाणात आर्थिक सहकार्य करण्यात येणार आहे. कलाप्रदर्शनाच्या निमित्ताने सर्व कलाकाराची थोडक्यात माहिती व एक चित्र असलेले एक छोटासा कॅटलॉगही प्रसिध्द करण्याचा मानस आहे आपण कलेचे जाणकार असल्यामुळे आपण माझ्या कला पुष्कर – राज रंगरेखा कार्यशाळेसाठी आपणास निमंत्रित करत आहोत.
या कार्यशाळेत चित्रकार भगवान चव्हाण -चेन्नई,
दत्तात्रय पाडेकर -मुंबई,आशुतोष आपटे -पालघर, डी.एस. राणे -मुंबई, निलेश शिळकर -रत्नागिरी,जावेद मुलानी – नवी मुंबई, श्वेता उरणे – इचलकरंजी, निलेश शहरकर – नाशिक, डॉ. सौम्या सुरेशकुमार – मुंबई, विष्णू परीट – संगमेश्वर, दर्शन महाजन -मुंबई, चेतन गंगावणे -कुडाळ, प्रविण मिसाळ – चिपळूण , प्रविण उटगी – नवी मुंबई, मकरंद राणे -मुंबई, अब्दुल गफार – नागपुर,विवेक लाड – नागपुर, बालाजी भांगे – पंजाब, शिवाजी म्हस्के – कोल्हापुर, संपत नायकवडी – कोल्हापुर,चंद्रकांत प्रजापती – गुजरात, भावेश पटेल – गुजरात, अजेय दळवी – कोल्हापुर, राजेंद्रकुमार हंकारे – कोल्हापुर, संदेश मोरे – मुंबई, राजेंद्र महाजन – चोपडा, राखी अरदकर – सिंधुदुर्ग, अर्पिता पवार – कराड, रचना नगरकर – मुंबई, अंकिता अस्वले पनवेल, आकाश सुर्यवंशी – पुणे, प्रणय फराटे – मुंबई, अनुजा कानिटकर – रत्नागिरी, जनार्दन खोत – सिंधुदुर्ग हे सहभागी होणार आहेत.