(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत रत्नागिरी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्वच उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्याने पक्षात चिंतनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
निवडणूक निकालानंतर घोसाळे यांनी पक्षनिष्ठेची भूमिका अधोरेखित करत पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेतली. “अनेक पदाधिकारी शिंदेसेनेत दाखल झाले असले तरी सर्वसामान्य कार्यकर्ता आजही ठाकरेंसोबत ठामपणे उभा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील अनेक गटांमध्ये लढती अटीतटीच्या झाल्या. काही ठिकाणी उमेदवार अत्यल्प मतांनी पराभूत झाले. ‘लढत एकतर्फी होऊ दिली नाही; प्रमुख नेते फिरले नसतानाही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मशालीचा झेंडा खांद्यावर घेत ग्रामीण भाग पिंजून काढला,’ असे घोसाळे यांनी नमूद केले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाला एकूण सुमारे ४५ हजारांहून अधिक मते मिळाली. मात्र, त्या मतांचे जागांमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. या पराभवाने कार्यकर्त्यांमध्ये खंत व्यक्त होत असली तरी पक्षाची मुळे ग्रामीण भागात दृढ असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नसल्याचे घोसाळे यांनी ठाम शब्दांत सांगितले. “ही लढाई विचारांची आहे; पराभव तात्पुरता असतो,” असे म्हणत त्यांनी भविष्यात संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.

