(संगमेश्वर)
देवरुख येथील जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत देवरुख शहरात भव्य निषेध सभा आयोजित करण्यात आली. या वेळी विविध धर्मीय नागरिक, व्यापारी वर्ग, ग्रामस्थ तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या सभेत हल्ल्यातील मृतांना आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी दहशतवादाचा तीव्र शब्दांत निषेध करत पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. सोळजाई ग्रामदेवी मंदिर देवरुखचे अध्यक्ष श्री. शरदचंद्र काशिनाथ गांधी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण कार्यक्रम काळात देवरुख पोलिसांनी बंदोबस्ताचे उत्कृष्ट नियोजन करून शांतता व सुव्यवस्था राखली. या निमित्ताने देवरुख शहराने सर्वधर्मीय ऐक्याचे दर्शन घडवले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक स्वयंसेवक आणि नागरिकांनी सहकार्य केले.