(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) कार्यरत असलेले कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी १९ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलनावर गेले आहेत. राज्यभरातील सुमारे ८०० कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा उपकेंद्रे, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, तसेच जिल्हा रुग्णालयातील परिचारिका, प्रयोगशाळा तज्ज्ञ, फार्मासिस्ट, आरोग्य सहायक, लिपिक आणि आरोग्य स्वयंसेविका कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे लसीकरण मोहीम, रक्तशुद्धीकरण सेवा, असंसर्गजन्य आजारांवरील मोहिमा, जननी सुरक्षा आणि कुटुंब कल्याण कार्यक्रम पूर्णपणे ठप्प झाले आहेत.
जिल्ह्यातील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने त्यांच्यावर प्रचंड कामाचा ताण पडत आहे. रुग्णसेवा कोलमडल्याने अनेक नागरिक खासगी रुग्णालयांकडे धाव घेत असून त्यांच्यावर मानसिक ताण आणि आर्थिक भार वाढला आहे. विशेष म्हणजे, नवजात बालकांसाठी राबविण्यात येणारी लसीकरण मोहीम पूर्णपणे बंद पडली आहे.
दरम्यान, आरोग्य सेवा अभियान संचालकांनी आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्यथा नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडून प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अनुपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना त्या दिवसांचे वेतन दिले जाणार नाही, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा असून, कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे संप लवकरात लवकर मागे घेऊन सेवा पूर्ववत करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

