(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मधील उपक्रमशील कालाध्यापक शामराव गजानन पवार यांना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे यांच्या मार्फत दिला जाणारा सन २०२४ चा राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक नंदुरबारमधील शहादा येथे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नंदुरबार येथे राज्याचे पवन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार भाऊ रावल , नंदुरबारचे जिल्हाधिकारी मिताली सेठी ,मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत हा राज्य पुरस्कार समारंभ संपन्न झाला.
आदर्श कलाध्यापक शामराव पवार हे गेली २२ वर्षे बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेजमध्ये कला अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शासकीय रेखकला परीक्षा त्यामध्ये एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षांसाठी सातत्यपूर्ण प्रभावीपणे मार्गदर्शन करून त्यांनी अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकवले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते अनेक उपक्रमांत ते स्वतः ला झोकून देऊन काम करत आले आहेत. ते चित्रकलेचे जाणकार असून संगीत व गायनाचीही त्यांना प्रचंड आवड आहे. सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांत ते नेहमीच अग्रेसर असतात. या कामात त्यांना शाळा व संस्थेचे उत्तम पाठबळ मिळते.कुटुंबाची त्यांना चांगली साथ असते. यापूर्वीही श्री.पवार यांना प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
व्यक्तीचित्र रेखाटण्यात त्यांचा हातखंडा आहे. फलक लेखन, विविध विषयांवर रांगोळी रेखाटून त्यांनी आपल्या कलेला अधिक विस्तारित केले आहे. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील अनेक स्पर्धांमध्ये ते स्वतः सहभागी होऊन आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरित करून त्यांचे अनेक विद्यार्थी आज मोठमोठ्या कलाक्षेत्रात कार्यरत आहेत.
कलाध्यापक शाम गजानन पवार हे मालगुंड गावचे सुपुत्र होय. राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल कला शिक्षक शाम पवार यांचे मालगुंड विद्यालय, मालगुंड एज्युकेशन सोसायटी तसेच सर्वच स्तरांतून त्यांचे खास अभिनंदन होत आहे. सदर पुरस्कार वितरण समारंभ हा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मिरा प्रताप लॉन येथे उत्साहात संपन्न झाला.