(मुंबई)
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला “स्वयंभू प्रॉडक्शन” निर्मित ‘समर्थयोगी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वसईतील भुईगाव येथील स्वामी समर्थ मठावर आधारित हा चित्रपट श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्म यांना आधुनिक भावस्पर्शी कथानकाची जोड देतो.
चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन चंद्रशेखर सांडवे यांनी केले आहे. छबूबाई व्यंकटराव सांडवे या चित्रपटाच्या निर्माती असून प्रकाश राणे आणि विवेक पर्वते सहनिर्माते आहेत. तन्मय सांडवे क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून कार्यरत असून छायाचित्रण व संकलनाची जबाबदारी रितेश पाटील यांनी सांभाळली आहे. आकर्षक पोस्टर डिझाईन निखिल मालुसरे यांनी तयार केले असून कार्यकारी निर्माता सर्वेश सांडवे आहेत.
या चित्रपटात अशोक कुलकर्णी, अमित फाटक, सानिका मोजर, सुबोध पवार, प्रकाश राणे आणि चंद्रशेखर सांडवे यांच्या भूमिका असून कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
अध्यात्मिक पाश्र्वभूमी असलेला आणि प्रदीर्घ काळापासून चर्चेत असलेला ‘समर्थयोगी’ प्रेक्षकांना नेमका कसा सुखद अनुभव देतो, हे २२ डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.

