(गणपतीपुळे / वैभव पवार)
आजच्या अद्ययावत प्रसारमाध्यमांच्या काळात मोबाईल सारख्या विश्वातून विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण करणे आणि त्यांना खेळायला प्रोत्साहन देणे हे अत्यावश्यक बनले असून त्यासाठी तशी संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे मत रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी व्यक्त केले. ते जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती रत्नागिरी अंतर्गत गणपतीपुळे प्रभागाच्या सन २०२४ – २५ च्या प्रभागस्तरीय शालेय हिवाळी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आज मुले मोबाईल आणि प्रसारमाध्यमांच्या विश्वात रममाण झाल्याने एकलकोंडी बनत चालली आहेत. त्यांना भविष्यासाठी भारताचा नागरिक म्हणून तयार करणे आवश्यक आहे. मात्र बदलत्या काळात विद्यार्थी अत्यंत हे काम खुप जिकिरीचे बनत चालले आहे. अशावेळी त्यांच्यात संवेदनशीलता जागे करतानाच खिलाडूवृत्ती निर्माण करण्यासाठी मैदानी खेळ उपयुक्त ठरत असतात. त्यामुळे अशा स्पर्धांचे महत्व खुप मोठे आहे, असे सांगतानाच शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविक करताना गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार यांनी क्रीडा स्पर्धेचे स्वरूप, त्यांचे महत्व आणि उपयुक्तता स्पष्ट करतानाच दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेचे नियोजन सांगितले.
तसेच यावेळी उपस्थित असणारे सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील साहेब यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण स्पर्धेच्या युगात खेळाला दुय्यम स्थान देत असतो, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच त्यांच्या खेळभावना जागृत करण्याची संधी मिळत असते, त्यामुळे अशा स्पर्धा होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली.
या उद्घाटनप्रसंगी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांच्यासह सागरी पोलीस ठाणे जयगडचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रसाद तथा बाबुशेठ पाटील, सरपंच अमित वाडकर, माजी सरपंच अप्पा धनावडे, ग्रामपंचायत सदस्य राजेश जाधव, माजी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पवार, जांभारी केंद्राचे केंद्रियप्रमुख उल्हास पाटील, कळझोंडी केंद्राचे विष्णू पवार, निवेंडी केंद्राचे रवींद्र आग्रे, संदखोल केंद्राचे अमर घाटगे, सामाजिक कार्यकर्ते आबा सुर्वे, शेखर भडसावळे, भाई जाधव, माजी सरपंच अनिकेत सुर्वे यांच्यासह परिसरातील विविध ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
या दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये लहान व मोठ्या गटातील मुलां – मुलींसाठी कबड्डी, खो – खो, लंगडी हे सांघिक तर बॅडमिंटन, बुद्धीबळ, ५० व १०० मीटर धावणे, गोळा फेक, थाळी फेक, उंच उडी व लांब उडी हे वैयक्तिक खेळ घेण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत गणपतीपुळे प्रभागातील कळझोंडी, वाटद, जांभारी, निवेंडी, संदखोल केंद्रातील शाळा सहभागी झालेल्या असून यावर्षी स्पर्धेचे आयोजन रत्नागिरी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे आणि गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली संख्येने सर्वात छोटे असणाऱ्या वाटद केंद्राने केले आहे.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वाटद केंद्राचे केंद्रियप्रमुख दिपक सुतार, स्पर्धा संयोजक अश्विनी पवार यांच्या सूचनेनुसार वाटद शितपवाडी आणि वाटद बौद्धवाडीमधील सर्व ग्रामस्थ यांच्यासह वाटद केंद्रातील शिक्षक प्रयत्न करत आहेत.