आरटीई प्रवेशासाठी खोटा रहिवासी पुरावा सादर करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी पुण्यातील 18 पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून, बावधन पोलिसांकडे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खोटी कागदपत्र सादर करून प्रवेश मिळवणाऱ्या पालकांना मोठा धडा मिळाला आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. परंतु, अनेक पालक खोटी कागदपत्र सादर करून आपल्या पाल्याला आरटीई अंतर्गत प्रवेश मिळून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. शिक्षण विभागाने वेळोवेळी परिपत्रक प्रसिद्ध करून बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या पालकांविरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्याचप्रमाणे खोटा रहिवासी पुरावा सादर करून आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवल्यास संबंधित पालकांविरोधात कारवाई केली जाईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते.
पालकांनी सादर केलेल्या रहिवासी प्रमाणपत्राच्या आधारे शिक्षण विभागातील अधिकारी संबंधित पत्त्यावर जाऊन चौकशी करू शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले होते. तरीही अनेक पालकांनी खोटी कागदपत्र सादर करून आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 पर्यंत माताळवाडी भुगाव या ठिकाणी संबंधित पालकांनी खोटी कागदपत्र सादर करून शासनाची दिशाभूल केली असल्याचे आढळून आले आहे. सचिन चंद्रकांत भोसले, खंडू दिलीप बिरादार, रामकृष्ण तानाजी चोंधे, सुमित सुरेश इंगवले, विजय सुभाष जोजारे, मंगेश गुलाब काळभोर, रोहिदास मारुती कोंढाळकर, श्रीधर बाबुराव नागुरे, बाबासाहेब छबुराव रंधे, विलास रामदास साळुंखे, गणेश राजाराम सांगळे, रुपेश बाळकृष्ण सावंत, दिगंबर पंडित सावंत, चंदन अंकुश शेलार, कुंभराम सांगीलाल सुतार, मंगेश झबुलाल गुरव, विवेक जयवंत जोरी, उमेश हिरामण शेवडे या 18 पालकांनी खोटी कागदपत्र सादर करून प्रवेश मिळवले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी शिक्षण विभागाकडून चौकशी समिती स्थापना करण्यात आली होती. समितीने दिलेल्या अहवालानंतर खोटी कागदपत्र सादर करून प्रवेश मिळाल्याचे समोर आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.