(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे एर्टिगा आणि वेगनअर या दोन वाहनाच्या अपघातात दोन्ही वाहनांमधील सात प्रवाशी जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली असून, अपघाताची बातमी समजताच संगमेश्वर पोलीस दाखल झाले. जखमीना 108 रुग्णवाहीका व खासगी वाहनाने संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
एर्टिगा क्रमांक HR55AR 4131 आणि वेगनअर MH EY 4305 या दोन वाहनांचा भीषण अपघात मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन पासून जवळच असलेल्या मोरया ढाब्या समोर झाला. एर्टिगा चालक अतुल आंनद किशोर नंदा वय 34 मूळ राहणार फरीदाबाद हा गोवा ते मुंबई अंधेरी येथे जात होता. तर वेगनअर चालक ओंकार शंकर घाडगे वय 23 वर्ष राहणार पाटण (आंबळे ) हा सातारा ते गणपतीपुळे जात असताना सुसाट वेगात येणाऱ्या एर्टिगा चालकाने वेगनअर ला समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की गोव्याच्या दिशेने धावणाऱ्या वेगनअर मुंबई च्या दिशेने फिरली होती.
दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर झालेली धडक एवढी जोरदार होती की एर्टिगा चे एअर बॅग उघडल्याने होणारी जीवित हानी टळली असून या एर्टिगा चालक अतुल नंदा, लिंडा मेलवीन डिकॉस्टा वय वर्ष 58 अंधेरी, शॉन मेलवीन डीकॉस्टा वय वर्ष 24 राहणार अंधेरी,ह्यांना मार लागला असून लिंडा मेलवीन या महिलेच्या डोक्याला मार लागून रक्तस्त्राव सुरु होता. तर पायाला ही दुखापत झाली आहे. तर वेगनअर मधील ओंकार घाडगे वय वर्षे 23,अभिजित अशोक खरात वय वर्ष 24 राहणार सातारा, प्रदीप लक्षण माने वय वर्ष 20 राहणार सोलापूर यांना मार लागला असून ह्या सर्वांवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून डोक्याला मार लागलेल्या लिंडा मेलवीन हिच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आले आहे.
अपघात झाल्यामुळे मुंबई तसेच गोवा च्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस कॉन्सटेबल अवॉर्ड यांनी अपघाताची माहिती मिळताच अपघातस्थळी पोहचून रखडलेली वाहन वर्दल सुरळीत केली. व जखमीना स्थानिकांच्या मदतीने 108 रुगमवाहीका व खासगी वाहनाने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलवले.
अपघाताचा पुढील तपास वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप. नी. चंद्रकांत कांबळे करीत आहेत.