( रत्नागिरी /प्रतिनिधी )
कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली की, यश हे तुम्हाला रोखू शकत नाही. परिस्थितीवरही मात करीत सृष्टी वेल्हाळ हि चार्टर्ड अंकौंटंट झाली आहे. नुकताच ICAI CA Result 2024 परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील कु. सृष्टी संदीप वेल्हाळ हिने उत्तुंग भरारी घेत यश संपादन केले. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या रत्नागिरी, संगमेश्वरच्या पदाधिकाऱ्यांनी सृष्टी वेल्हाळच्या निवस्थानी भेट घेऊन तिचे अभिनंदन केले.
लहापणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या सृष्टी वेल्हाळने दहावी, पदवी शिक्षण घेऊन लहानपणी उराशी बाळगलेले स्वप्न अथक प्रयत्नांनी पूर्ण केले आहे. सृष्टीच्या वडीलांचे देवरुख मराठा भवन जवळ ‘वेल्हाळ सुविधा’ या नावाने संगणक सेंटर चालवतात. आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुलीने पाहिलेले चार्टर्ड अकांऊटंट (CA) बनण्याचे स्वप्न सत्यात उतरल्याने वडिलांसह कुटुंबीय समाधान व्यक्त करत आहेत. सृष्टीने देखील परिस्थितीशी जुळवून घेत खूप परिश्रम घेतले. सृष्टी चौथीत असताना मेरिट लिस्टमध्ये येऊन सुद्धा तिला स्कॉलरशिप मिळाली नव्हती. शिक्षण विभागाच्या पुण्यापर्यंत जाऊन पाठपुरावा केला तरीदेखील स्कॉलरशिप मिळाली नाही. सृष्टीबाबत घडलेला प्रसंग तिच्या वडिलांनी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना सांगितला होता. शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत सृष्टीच्या वडिलांनी खंत व्यक्त केली होती.
परंतु, जिद्द, चिकाटीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळते. विद्यार्थ्यांनी खचून न जाता अभ्यासात सातत्य राखणे गरजेचे आहे. तसेच मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन गरुड भरारी घेणाऱ्या सृष्टी वेल्हाळ हिने उराशी बाळगलेल्या स्वप्नाची पूर्ती करून जिद्दीच्या जोरावर यश मिळविता येते हे दाखवून दिले आहे. यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव, संगमेश्वर तालुका अध्यक्ष शेखर जोगळे, सचिव दिपक तावडे, सक्रिय कार्यकर्ते सुनिल करंडे, प्रकाश खांडेकर, सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ता संगमेश्वरचे संपर्क प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते श्री दिपक भेरे, सामाजिक कार्यकर्ते किशोर अनंत नर आदींनी तिची भेट घेतली. संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ,व पेढे भरवुन अभिनंदन केले. तसेच सृष्टीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या. सृष्टी सीए परीक्षेत यश मिळवल्याने तिच्यावर चोहोबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे.