(रत्नागिरी)
शहरातील थिबापॅलेस येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाई एका शासकीय महाविद्यालयाच्या मागील रस्त्यावर १ लाख ३१ हजार ७४० रुपयांचा अमली पदार्थ बाळणाऱ्यास अटक केली. संशयित हा रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार आहे. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी तसेच हद्दपारी बाबत गुन्हा दाखल केला आहे. फैसल मकसूद म्हसकर (रा. कर्ला जामा मशिदजवळ, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ३०) सायंकाळी निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे, तसेच शहर पोलिसांची डीबी पथक गस्त घालत आहे. थिबापॅलेस येथे संशयितरित्या हालचाल करत असताना एकजण सापडला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यांच्याकडे एका पारदर्शक पिशवीत हिरवट काळपट रंगाचा, उग्र वासाचा गांजा, त्याच पिशवीत एकूण २ किलो वजनाचा २९ ग्रॅमचा १ लाख २१ हजार ७४० रुपयांचा अमली पदार्थ, तसेच १० हजाराचा मोबाईल सापडला. तसेच गुन्हेगार हा रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातून २ वर्षाकरिता हद्दपार केलेला असताना कोणतीही परवानगी न घेता रत्नागिरीत येऊन थिबापॅलेस येथे शासकीय महाविद्यालयाच्या पाठीमागे अमली पदार्थ बाळगलेल्या स्थितीत सापडला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हेडकॉन्स्टेबल शांताराम झोरे व पोलिस हवालदार गणेश सावंत यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.