(रत्नागिरी)
तालुक्यातील टिके-कांबळेवाडी फाटा येथे शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलात फिरणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. ग्रामीण भागात गुप्तपणे वन्य प्राण्यांच्या शिकार करणाऱ्या टोळ्या एकेकाळी सक्रिय होत असे मात्र अलीकडच्या काळात याचे प्रमाण कमी झाले आहे. निवडणुकीचा कालावधी सुरू आहे,पोलीस दिवस-रात्र शहरासह अन्य भागात गस्त घालत आहे.
टिके गावात दोघेजण शिकार करण्याच्या उद्देशाने मध्यरात्री फिरत होते. पोलिसांनी या दोघांनाही पकडले असून अनिश अरुण रेडीज (२४, रा. वाणीपेठ हरचेरी, चांदेराई, रत्नागिरी) व संजय मधुकर महाजन (५५, रा. निरखुणेवाडी चिंद्रवली, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (ता. २९) मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास निदर्शनास आली. पकडण्यात आलेल्या दोघांकडून सिंगल बॅरल बंदूक, सहा जिवंत काडतुस, मोटार आणि इतर साहित्य असे एकूण १ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संशयित ४५ हजारांची संगल बॅरल बंदूक, ६ जिवंत काडतुसे यांसह मोटारीतून शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असताना टिके-कांबळेवाडी फाटा निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल शांताराम झोरे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.