( संगमेश्वर / प्रतिनिधी )
विद्याव्रत म्हणजे मुलांना “आम्ही सतत अभ्यास करत राहू, शिकत राहू,त्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणू” असं लक्षात आणून देणारा , जाणीव करून देणारा हा महत्त्वाचा संस्कार कार्यक्रम. पौराणिक काळात मुलं ज्यावेळी गुरुगृही जायची तेव्हा त्यांच्यासाठी अशा प्रकारे ‘ उपनयन , व्रतबंध ‘ अशा संस्कार कार्यक्रमाने संस्कारित करून पाठवलं जायचं. अशाच प्रकारचा हा शैक्षणिक संस्कार! हा मुलांसोबत मुलींसाठीही केला जातो हे याचे वेगळेपण!!
युक्ताहार विहार, इंद्रिय संयमन, दैनंदिन उपासना, स्वाध्याय प्रवचन,सद्गुरु सेवा, राष्ट्रअर्चना अशा क्रमाने मुला मुलींनी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये नेमकेपणा आणि शिस्त आणण्यासाठी वरील सहा व्रतं घ्यावीत अशी या निमित्ताने अपेक्षा असते. थोडासा कठीण वाटणारा विद्याव्रताचा विषय मुलांना सहज समजावा या उद्देशाने वरील सहा व्रताना अनुसरून युनायटेड गुरुकुल मध्ये मागील आठवड्यात पूर्ण आठवडाभराची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
योग्य आहार कसा असावा? कोणते खाद्यपदार्थ नेमके आपल्या शरीराला उपयोगी असतात ?कोणत्या खाद्य सवयी आपण टाळायला हव्यात आणि हे सगळं करत असताना आपले दैनंदिन वेळापत्रक, फिरणं ,बोलणं, वागणं, समाजातील वावर हे सगळं म्हणजेच आपला विहार कसा अर्थपूर्ण असावा यासंबंधीचे व्याख्यान चिपळूण मधील वैद्यकीय क्षेत्रातील युवा वैद्य प्रतीक मेहता यांच्या व्याख्यानातून मुलांना उलगडत गेलं. आजूबाजूला भरलेलं मोहाचं , प्रलोभन दाखवणार जग, पावला पावलावर आपल्या मनाला विचलित करणाऱ्या असंख्य गोष्टी यांना सामोरे जात आपल्या अभ्यासावर, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी इंद्रिय संयमनाचा अवलंब करत,स्वतःच्या मनाला लगाम घालायची गरज आहे. त्यासाठी काय काय करता येईल यासंबंधीचे इंद्रिय संयमन विषयाचे व्याख्यान चिपळूण मधील ज्येष्ठ वैद्य स्वातीताई मुसळे यांनी केले .
उपयुक्त आहार विहाराने आणि इंद्रिय संयमनाने स्थिर झालेल्या मनाला ताकद देण्यासाठी श्रद्धेने, निष्ठेने आपण उपासना केली पाहिजे. त्यात सातत्य, नियमितपणा यावा म्हणून दैनंदिन उपासना केली पाहिजे. उपासना म्हणजे आपण रोज जे काही श्लोक,स्तोत्र म्हणतो त्यांचा भावार्थ समजून घेत केलेली उपासना आपल्याला अधिक सजग समजूतदार बनवते, असं मुलांना समजून देत दैनंदिन उपासना याविषयी मार्गदर्शन वैद्य राजश्रीताई सोमण यांनी आपल्या मधाळ, ओघवत्या, अभ्यासपूर्ण शैलीने केले.
स्वाध्याय व प्रवचन या शब्दातील ‘” स्वाध्याय म्हणजे स्वतः अनुभव घेत शिकणे!” आणि “प्रवचन म्हणजे आपण शिकलेलं दुसऱ्याला सांगत सांगत पुन्हा शिकणे ” असा अर्थ उलगडून सांगत स्वाध्याय प्रवचन हा आपल्या झालेल्या अभ्यासाला बळकटी आणण्यासाठीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे असं आपल्या व्याख्यानातून ज्ञान प्रबोधिनी चिपळूणचे जेष्ठ व उत्साही कार्यकर्ते श्री.माधव मुसळे यांनी हसत खेळत हलक्याफुलक्या वातावरणात रंजक पद्धतीने मुलांच्या लक्षात आणून दिले.
रोजच्या जीवनात पदोपदी प्रत्येक गोष्टीतून आपण काहीतरी शिकत असतो आणि हे रोज नवे अनुभव देऊन आपल्याला शिकवणारे प्रत्येक जण हे आपले गुरु सद्गुरू असतात. त्या गुरूंचा आदर करणे म्हणजे ‘ सद्गुरुसेवा ‘ असे मुलांच्या लक्षात आणून देताना आपल्या ओघवत्या आणि प्रासादिक वाणीने खेळ,कला, संत साहित्य यातील अनेक वेगवेगळी उदाहरण सांगत प्रवचनकार श्री.धनंजय चितळे यांनी मुलांना ‘ सद्गुरु सेवा ‘ या व्रता विषयीचे मार्गदर्शन केले. तसेच सद्गुरू कृपेने आपण केलेले प्रत्येक काम हे देशाच्या हिताचे कसे होईल, देशाच्या उपयोगाचे कसे होईल, आपल्या कामामुळे आपल्या कुटुंबाचा, समाजाचा, गावाचा पर्यायाने देशाचा नावलौकिक कसा वाढेल असा विचार करत करत कोणतीही कृती करणं म्हणजे ‘ राष्ट्रअर्चना ‘ हे विद्याव्रतातलं सहावं व्रत याचाही अर्थ मुलांना सुलभ करून सांगितला.
विद्याव्रत संस्काराची पूर्वतयारी म्हणून आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेला समांतररित्या गुरुकुलातील अध्यापक गटानेही एक वेगळ्या प्रकारचे कल्पक काम करून बळकटी आणली ! ते कल्पक काम म्हणजे स्वर्णलता भिशीकर यांनी विद्याव्रतार्थी होऊ इच्छिणाऱ्या मुलांना उद्देशून लिहिलेल्या ‘उजळती वाट’ या पुस्तकातील सहा वेगवेगळ्या पत्रांचे वाचन करून त्याची ध्वनिमुद्रणे मुलांना आणि पालकांना रोज नियमितपणे पाठवली व मुलांनीही या सर्व पत्रांना उत्स्फूर्तपणे प्रतिसादात्मक पत्रोत्तरे लिहिली!
मागील आठवड्यातील सामूहिक प्रयत्नातून विद्यार्थी व पालकांमध्ये विद्याव्रत संस्काराविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. गुरुकुल आणि एकूणच अभ्यास रचनेत विद्याव्रत संस्काराचे महत्त्व याविषयी पालकांशी अधिक माहितीपर संवाद साधण्यासाठी गुरुकुल मध्ये शुक्रवार दिनांक ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी पाच ते सहा साडेसहा या वेळेत निगडी गुरुकुलचे प्रमुख आणि ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे उपप्रमुख श्री.आदित्य शिंदे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.तसेच गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर २०२४ या दिवशी सकाळी ०८.०० ते १०.३० या वेळेत गुरुकुल विभागातील इयत्ता नववी आणि इयत्ता दहावीच्या वर्गातील ३५ विद्यार्थ्यांचा मंगल प्रासादिक आणि शैक्षणिक वातावरणात विद्याव्रत संस्कार समारंभ संपन्न होणार आहे.