( संगमेश्वर /प्रतिनिधी )
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी अंतर्गत संस्कार विभागाच्या वतीने शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी संगमेश्वर येथील सम्यक सभागृहात बौद्धाचार्य मार्गदर्शन मेळावा व सनद नूतनीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्कार विभागाचे उपाध्यक्ष विजय जाधव असणार आहेत.
जिल्हाभरातील बौद्धाचार्यांना संघटनात्मक बळ देण्याबरोबरच बदलत्या सामाजिक परिस्थितीत विधीसंस्कारांची दिशा, बौद्धाचार्यांची जबाबदारी आणि आधुनिक कार्यपद्धती यांचा सखोल ऊहापोह या मेळाव्यात करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता बौद्धाचार्य नोंदणीने होईल, तर सकाळी १० वाजता संपूर्ण सूत्रपठण करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. त्रिशरण पंचशीलाने कार्यक्रमाला वैचारिक अधिष्ठान दिल्यानंतर स्वागत व प्रास्ताविक सत्र पार पडेल. संस्कार विभागाचे सचिव विकास पवार प्रास्ताविक करणार असून सूत्रसंचालनाची जबाबदारी सचिव अल्पेश सकपाळ सांभाळणार आहेत.
‘विधी संस्कारातील बदल आणि आधुनिक बौद्धाचार्य कसा असावा’ या विषयावर जिल्हाध्यक्ष अनंत सावंत गुरुजी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ‘दि. बुद्धिस्ट सोसायटीची गतिमान वाटचाल आणि सद्यस्थितीतील घडामोडी’ या विषयावर महासचिव एन. बी. कदम विचार मांडतील. बौद्धाचार्यांसाठी संदेशपर मार्गदर्शन कोषाध्यक्ष प्रदीप जाधव करणार आहेत. या मेळाव्यास जिल्ह्यातील सुमारे २०० बौद्धाचार्य उपस्थित राहणार असून त्यांना संस्थेची सनद व ओळखपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्हा तसेच सर्व तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार असल्याने हा मेळावा संघटनात्मक दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

