( पाली / वार्ताहर )
पाली बसस्थानक हे कोकण विभागातील एक प्रमुख बसस्थानक असून ते मुंबई गोवा व मिऱ्या नागपूर या दोन मुख्य राष्ट्रीय महामार्गांवर असल्याने कायमच कर्नाटक,पश्चिम महाराष्ट्र,गोवा, तळकोकण यासोबतच मुंबई विभागातील प्रवाशांसाठी मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळखले जाते. याकरिताच त्याचे काही महिन्यांपूर्वी अत्यंत दर्जेदार असे नूतनीकरण करून प्रवाशांच्या सेवेत सुसज्ज केलेले आहे असे प्रतिपादन रायगड विभागीय वाहतूक अधीक्षक मनीषा पाटील यांनी केले
पाली बसस्थानकाचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड विभागाच्या विभागीय वाहतूक अधीक्षक मनीषा पाटील, रायगड विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी सुहास कांबळे यांनी पाहणी करून सर्वेक्षण करून मूल्यांकन केले. यावेळी त्यांनी बसस्थानकाचा परिसर, पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, व्यावसायिक आस्थापना यांची प्रवाशांची संवाद साधत पाहणी करून मूल्यांकन केले.या सर्वेक्षणासाठी पालीतील प्रतिष्ठित नागरिक सरपंच विठ्ठल सावंत,अॅड.सागर पाखरे, पोलीस पाटील अमेय वेल्हाळ,धनंजय चव्हाण यांनी सर्वेक्षणातील मुद्द्यानुसार गुणात्मक मूल्यांकन करून अभिप्राय नोंदविले आहेत. यावेळी लांजा स्थानकप्रमुख भाग्यश्री प्रभुणे, पाली बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रदीप सावंत, सुनील माळी, प्रवासी मित्र उपस्थित होते.
राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व पालीचे सुपुत्र उदय सामंत यांनी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या निधीतून पाली बस स्थानकाचे गतवर्षीच नूतनीकरण करून सर्व सोयी सुविधा युक्त अत्यंत सुसज्ज वास्तू उभी केली आहे. पाली बसस्थानक हे व्यापारी दृष्ट्या महत्वाचे व मध्यवर्ती असल्याने कायमच प्रवाशांची रेलचेल असते त्यामुळे बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बसस्थानक आवारात पे अँड पार्किंग ची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर सेल्फी पॉईंट ची व्यवस्था बसस्थानक परिसरात करण्यात येणार आहे.
फोटो- पाली बस स्थानकाचे स्वच्छ स्थानक अभियानांतर्गत सर्वेक्षण करताना रायगडच्या विभागीय वाहतूक अधीक्षक मनीषा पाटील,वसुहास कांबळे,भाग्यश्री प्रभुणे, विठ्ठल सावंत, अॅड.सागर पाखरे, अमेय वेल्हाळ व मान्यवर.

