(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड पंचक्रोशीतील अग्रगण्य संस्था “ब्राह्मण सभा मालगुंड ब्राह्मण सभा पंचक्रोशीच्या वतीने 37वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या सार्वजनिक गणेशोत्सवात पारंपरिक पद्धतीने लेझीम व ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पांची आगमन मिरवणूक काढण्यात आली.
या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये महिला व मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच श्री सचिन काळे यांचा “संगमेश्वरी रायता” हा विनोदी कार्यक्रम सादर होणार आहे. याचसोबत कै. प्र. ल मयेकर लिखीत, श्री अमेय धोपटकर दिग्दर्शित “गोड गुलाबी” हे नाटकही स्थानिक कलाकार सादर करणार आहेत. यासोबतच श्लोक पाठांतर स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, रांगोळी, कॅरम, बुद्धीबळ इ स्पर्धा होणार आहेत. तसेच महिला, मुले व पुरुषांचे फनी गेम्सही होणार आहेत.
पुरुष व महिला श्रींसमोर सहत्रावर्तने करणार आहेत.
ज्ञातीतील शैक्षणिक प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा या उत्सवात सन्मान केला जातो. तसेच ज्ञातीतील विविध क्षेत्रात यशस्वी बंधू भगिनींचा सत्कारही केला जातो. यातून त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. त्यातून अन्य लोकांना प्रेरणा मिळावी हा उद्देश देखील आहेच. यानिमित्ताने ज्ञातीतील बंधू भगिनींना व विशेषतः लहान मुलांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते व याद्वारे नवनवीन कलाकार तयार होत आहेत. तसेच विविध माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे कामही या उत्सवाद्वारे केले जाते.
कला, क्रीडा, अध्यात्म व संस्कृती याची सांगड घालत दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात पंचक्रोशीतील ज्ञातीबांधव हा उत्सव साजरा करत आहेत.