(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
तालुक्यातील देवरुख परिसरातील भायजेवाडी येथे एका वृद्ध महिलेने स्वतःला पेटवून घेत जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यमुना भिकू भायजे (वय ८०) या ११ मे रोजी रात्री आपल्या घरातील खोलीत झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास त्या घराच्या मागील अंगणात गेल्या आणि त्यांनी माचिसच्या साहाय्याने स्वतःला पेटवून घेतल्याचे समोर आले आहे. १२ मे रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा चंद्रकांत भायजे याला काही कारणाने जाग आली असता आई जळत असल्याचे दिसून आले. त्यावेळी त्या गंभीर भाजल्या अवस्थेत असूनही हालचाल करत असल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालय, देवरुख येथे हलविले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच पहाटे ५.१५ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची खबर बळीराम भिकू भायजे यांनी देवरुख पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद (आमृ. क्रमांक १५/२०२६) केली असून, आत्महत्येमागील कारणांचा तपास सुरू आहे. दरम्यान, वृद्ध महिलेच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे भायजेवाडी परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

