(चिपळूण/ रत्नागिरी)
अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाने सुरू केलेल्या ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चिपळुणात गांजाच्या बेकायदा लागवडीचा पर्दाफाश केला. पिंपळी खुर्द येथील पटेल सॉ मिलच्या आवारात छापा टाकून पोलिसांनी ५.५३२ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली. या मुद्देमालाची किंमत एक लाख ३८ हजार ३०० रुपये असून, या प्रकरणी उत्तर प्रदेशातील २० वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.
२५ नोव्हेंबर रोजी रात्री ९.०५ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळी खुर्द येथील पटेल सॉ मिलच्या आवारात एनडीपीएस कायद्याच्या अनुषंगाने पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी गांजाच्या वनस्पतींची विनापरवाना लागवड करून त्यांची जोपासना केली जात असल्याचे तपासात आढळून आले. या प्रकरणी अभय प्रदीप पांडे (वय २०, मूळ रा. मलापांडे, कापुरवा, तहसील मिल्कीपूर, जिल्हा अयोध्या, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो पटेल सॉ मिलमधील कामगारांच्या निवासासाठी असलेल्या खोलीत वास्तव्यास होता. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेल्या गांजा (कॅनॅबिस) वनस्पतींची विनापरवाना लागवड करून त्यांची जोपासना केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पंचांसमक्ष पोलिसांनी ५.५३२ किलो वजनाची आणि एक लाख ३८ हजार ३०० रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त केली. ताब्यात घेतलेल्या तरुणाला पुढील कायदेशीर कारवाईसाठी चिपळूण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मिशन फिनिक्सअंतर्गत ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षित उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित थोरात व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, पोलीस हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, वैभव मोरे आणि चालक पोलीस हवालदार अतुल कांबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


