(रत्नागिरी /प्रतिनिधी)
कोकणच्या निसर्गरम्य आणि पर्यटकांनी गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यांवर सध्या भारतीय तटरक्षक दलाच्या (इंडियन कोस्ट गार्ड) अत्याधुनिक ‘हॉवरक्राफ्ट’ (ओव्हरक्राफ्ट) वाहनांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गणपतीपुळेसह जिल्ह्यातील अनेक प्रमुख किनाऱ्यांवर ही विशेष वाहने गस्त घालताना दिसत असून, त्यांची अवाढव्य रचना आणि थक्क करणारा वेग पर्यटकांसाठी कुतूहलाचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
समुद्राच्या उसळत्या लाटांवर स्वार होण्यासोबतच किनाऱ्यावरील मऊ वाळूवर आणि दलदलीच्या भागातही तितक्याच सुसाट वेगाने धावण्याची अद्भुत क्षमता हे या वाहनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. हवेच्या दाबावर तरंगत पुढे सरकणारे हे पारंपरिक नौकांपेक्षा पूर्णपणे वेगळे वाहन जेव्हा समुद्राच्या पाण्यातून थेट किनाऱ्यावरील वाळूवर येते, तेव्हा तो दृश्य अनुभव पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. त्यामुळे किनाऱ्यावर भ्रमंतीसाठी आलेले पर्यटक आणि स्थानिक नागरिक या आगळ्यावेगळ्या वाहनाकडे आकर्षित होत आहेत. तटरक्षक दलाच्या या वाहनाच्या वेगवान हालचाली आणि आधुनिक तंत्रज्ञानाने पर्यटकांना भुरळ घातली आहे. किनाऱ्यावरून धावणाऱ्या या वाहनाचे चित्रीकरण करण्यासाठी पर्यटकांची मोबाईल कॅमेऱ्यांसह झुंबड उडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पर्यटकांनी टिपलेले हे थरारक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असून, कोकण किनाऱ्यावरील या विशेष गस्तीची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
कोकणच्या विस्तीर्ण सागरी किनाऱ्यांची सुरक्षा, गस्त आणि आपत्कालीन परिस्थितीत जलद बचावकार्य राबवण्याच्या दृष्टीने तटरक्षक दलाची ही ‘हॉवरक्राफ्ट’ यंत्रणा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सागरी सुरक्षेचा हा भक्कम पहारा एकीकडे नागरिकांना सुरक्षिततेची हमी देत असतानाच, दुसरीकडे कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक अनोखी पर्वणी ठरत आहे.


