(पुणे / वृत्तसंस्था)
पुणे जिल्ह्यातील वाफगाव-गुळाणी मार्गावर एसटी बस आणि दुचाकीच्या अपघातात २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. बसला ओव्हरटेक करताना दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत सोनाली कोळेकर या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. तिच्या अकाली निधनाने कोळेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ही घटना वाफगाव-गुळाणी मार्गावरील राक्षेवाडी परिसरात घडली. खेड तालुक्यातील भोमाले गावची रहिवासी असलेली सोनाली पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. शासकीय अधिकारी होण्याचे ध्येय ठेवून ती अभ्यास करत होती. दुपारच्या सुमारास ती सहकाऱ्यासह दुचाकीवरून प्रवास करत असताना हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, राक्षेवाडीतील गणेश मंदिरासमोरून दुचाकी जात असताना सोनाली कोळेकर मागील सीटवर बसली होती. अरुंद रस्ता आणि वाहनांची गर्दी यामुळे पुढे जाण्यास अडथळा येत असल्याने दुचाकीस्वाराने एसटी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वारासह सोनाली रस्त्यावर कोसळली. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या एसटी बसच्या चाकाखाली सोनाली सापडली. बसचे चाक अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. बसचे चाक थेट पोटावरून गेल्याने तिला गंभीर दुखापत झाली आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे. अपघात घडल्यानंतर एसटी बस चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अवघ्या २२व्या वर्षी शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सोनालीचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.


