(ठाणे / वृत्तसंस्था)
अंबरनाथच्या जावसई परिसरात खेळत असलेल्या १२ वर्षीय मुलाला आइस्क्रीमचे आमिष दाखवून त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर मुलाच्या वडिलांना व्हॉट्सॲप कॉल करून पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि काही तासांतच मुलाची सुखरूप सुटका करत दोघांना ताब्यात घेतले. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.
अपहरणकर्त्यांनी मुलाच्या वडिलांना खंडणीची रक्कम घेऊन बदलापूर गावातील वडोदरा-जेएनपीटी महामार्गाजवळ येण्यास सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला. वडिलांनी खंडणीची रक्कम देऊन मुलाची सुटका केल्यानंतर तेथे दबा धरून बसलेल्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडले.
जावसई परिसरात मुलगा खेळत असताना दोन जणांनी त्याला आइस्क्रीम देण्याचे आमिष दाखवून आपल्यासोबत नेले होते. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी मुलाच्या वडिलांशी व्हॉट्सॲप कॉलद्वारे संपर्क साधत पाच लाख रुपयांची मागणी केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या वडिलांनी तातडीने अंबरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी मुख्य आरोपी हकीक सलीम खान याच्यासह एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्यासाठी अपहरणाचा कट रचल्याची कबुली मुख्य आरोपीने दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक अर्चना कटके यांनी दिली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मुख्य आरोपीला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


