(पुणे / वृत्तसंस्था)
पुण्याजवळील बोपदेव घाटात भरधाव आयशर टेम्पोने कारला धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटून बसची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना चिरडल्याची दुर्घटना बुधवारी (२५ नोव्हेंबर) दुपारी घडली. या भीषण अपघातात तीन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका विद्यार्थिनीचाही समावेश आहे. या घटनेमुळे कोंढवा आणि येवलेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी अंदाजे अडीच वाजण्याच्या सुमारास बोपदेव घाटातून येवलेवाडीच्या दिशेने आयशर टेम्पो (क्रमांक MH 04 FD 7654) भरधाव वेगाने येत होता. त्याचवेळी समोरून जाणाऱ्या हुंडाई व्हेन्यू कारला (क्रमांक MH 12 YN 3247) टेम्पोने पाठीमागून धडक दिली. या धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो रस्त्यालगत असलेल्या बसथांब्याकडे गेला. तेथे बसची प्रतीक्षा करीत उभ्या असलेल्या ट्रिनिटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना टेम्पोने धडक दिली.
अपघाताच्या वेळी बसथांब्याजवळ २० ते २५ विद्यार्थी उपस्थित होते. बसथांब्यापासून सुमारे ५० मीटर अंतरावर वाहतूक धीमी झाली असताना हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. टेम्पोच्या धडकेत पाच विद्यार्थी जखमी झाले. त्यांना तातडीने ससून रुग्णालय, रुबी हॉल क्लिनिक (वानवडी), भारती हॉस्पिटल आणि इनामदार हॉस्पिटल (कोंढवा) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या दुर्घटनेत विशाल दांगडे आणि मोहिनी चौधरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सिद्धेश राजे याला ससून रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. श्वेता तळेकर आणि सोहम घंगाळे हे दोघे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच कोंढवा बुद्रुक आणि येवलेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या आयशर टेम्पोसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक मारुती पाटील यांनी दिली.


