(ठाणे / वृत्तसंस्था)
भिवंडी शहरातील रोशन बाग परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 54 वर्षीय महिलेचा मृतदेह एका इमारतीच्या लिफ्टच्या डक्टमध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी शोध घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शाहीन मोहम्मद सुलतान शेख (वय 54, रा. हाजी सुलेमान अपार्टमेंट, धोबी तलाव) असे मृत महिलेचे नाव आहे. आपल्या बहिणीच्या घरातून निघाल्यानंतर लिफ्टचा अंदाज न आल्याने त्या लिफ्टच्या डक्टमध्ये पडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहीन शेख सोमवारी सायंकाळी राबिया अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे गेल्या होत्या. रात्री साडेनऊच्या सुमारास त्या घरी परतण्यासाठी बहिणीच्या घरातून निघाल्या. मात्र, त्या घरी पोहोचल्या नाहीत. कुटुंबीयांनी रात्री परिसरात त्यांचा शोध घेतला. त्यानंतर मंगळवारी सकाळी भोईवाडा पोलीस ठाण्यात शाहीन शेख बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
तक्रार मिळताच पोलिसांनी महिलेच्या मोबाईल नेटवर्कची तांत्रिक तपासणी सुरू केली. मोबाईलचे लोकेशन राबिया अपार्टमेंटच्या परिसरातच असल्याचे समोर आले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक जाधव आणि त्यांच्या पथकाने परिसरात शोधमोहीम राबवली. यावेळी इमारतीच्या लिफ्टच्या डक्टमध्ये शाहीन शेख यांचा मृतदेह आढळून आला.
शाहीन शेख या बहिणीला भेटून घरी जात असताना चौथ्या मजल्यावर त्यांनी लिफ्टचा दरवाजा उघडला. मात्र, लिफ्ट वरच्या मजल्यावर होती. लिफ्ट समजून त्यांनी लिफ्टच्या डक्टमध्येच प्रवेश केल्याने त्या खाली पडल्या. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून, याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, तसेच लिफ्ट वरती असताना खालच्या मजल्यावरील लिफ्टचा दरवाजा कसा उघडला गेला, याचा पुढील तपास भोईवाडा पोलीस करत आहेत. या घटनेमुळे लिफ्टमधील सुरक्षेचा मुद्दाही गंभीर प्रश्न बनल्याचे दिसून येत आहे.

