(पालघर / वृत्तसंस्था)
आईच्या निधनाचे दुःख ताजे असतानाच नायगावमधील सुतार कुटुंबावर आणखी एक मोठे संकट कोसळले आहे. अवघ्या १५ दिवसांपूर्वी आईला गमावलेल्या सहा वर्षांच्या मिलीत दिनेशकुमार सुतार याचा इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील लॉबीमधून पडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे, दुसऱ्याच दिवशी त्याला शिक्षणासाठी महाबळेश्वर येथील हॉस्टेलमध्ये पाठवण्याची तयारी पूर्ण झाली होती. त्याची बॅगही भरून ठेवण्यात आली होती. मात्र, हॉस्टेलला रवाना होण्यापूर्वीच घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. २४) दुपारी पावणेचारच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील नायगाव पूर्वेकडील नवकार टॉवर सोसायटीमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मिलीत घराबाहेरील ११ व्या मजल्यावरील लॉबीमध्ये एका लहान मुलीसोबत खेळत होता. खेळता खेळता तो खिडकीजवळ गेला. त्याचवेळी अचानक तोल जाऊन तो खिडकीतून खाली पडला. खाली कोसळताना तो इमारतीच्या अग्निशमन यंत्रणेच्या पाईपवर आदळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली.
आवाज आणि घटनेची माहिती मिळताच सोसायटीतील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या मिलीला तातडीने वसई येथील कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
या दुर्घटनेची पार्श्वभूमीही अत्यंत वेदनादायी आहे. मिलीतच्या आईचे अवघ्या १५ दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर वडील दिनेशकुमार सुतार यांनी मुलाच्या पुढील शिक्षणासाठी त्याला महाबळेश्वर येथील हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला होता. बुधवारी (दि. २५) सकाळी त्याला हॉस्टेलमध्ये सोडण्याचे नियोजन होते. त्यासाठी आवश्यक तयारी करून त्याची बॅगही भरून ठेवण्यात आली होती. मात्र, हॉस्टेलला जाण्याच्या आदल्याच दिवशी काळाने त्याच्यावर घाला घातला. पत्नीच्या निधनानंतर अवघ्या पंधरा दिवसांत मुलालाही गमावण्याची वेळ आल्याने दिनेशकुमार सुतार यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर नवकार टॉवरमधील बालकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. यापूर्वी २२ जुलै २०२५ रोजी नवकार सिटी फेज-१ मध्ये १२ व्या मजल्यावरून पडून चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर इमारतींच्या लॉबीतील खिडक्यांना सुरक्षेसाठी जाळ्या बसवण्याची मागणी रहिवाशांनी केली होती. मात्र, वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
या दुर्घटनेनंतर रहिवाशांनी बिल्डरच्या कथित निष्काळजीपणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लॉबीतील खिडक्यांना जाळ्या बसवण्याची मागणी सातत्याने करूनही बिल्डरने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, सोसायटीतील लिफ्टची अवस्थाही खराब असून एका विंगमधील लिफ्ट बंद असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
या प्रकरणात बिल्डरच्या कथित निष्काळजीपणाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे नायगाव परिसरात शोककळा पसरली असून निवासी इमारतींमधील लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


