(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहर आणि तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याने कहर माजवला. मोसमी पाऊस परतीच्या वाटेवर असतानाच हा अवकाळी पाऊस झाल्याने नागरिकांना अक्षरशः गाफील ठेवले. करबुडे, शितपवाडी आणि बौद्धवाडी या वाड्यांना या वादळाचा विशेष फटका बसला असून, अनेक घरांचे, गोठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार या आपत्तीत लाखो रुपयांची हानी झाली.
ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटात सुरू झालेल्या या पावसाने काही तासांतच रौद्ररूप धारण केले. वादळी वाऱ्यांच्या झोतामुळे अनेक ठिकाणी झाडे, पत्रे आणि कौले उडाली. करबुडे धनावडे वाडी येथील शेतकरी रमेश देमा धनावडे यांच्या दोन बैलांवर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला, ही घटना या वादळातील सर्वात हृदयद्रावक ठरली.
वादळाचा सर्वाधिक फटका करबुडे वाडीसह शितपवाडी आणि बौद्धवाडी या भागांना बसला आहे. प्रभाकर केरू जाधव, मिलिंद भागुराम जाधव, शैला अशोक जाधव, प्रकाश सिताराम जाधव, प्राची बबन जाधव, दीपक गोविंद पाष्टे, सुरेश रामचंद्र पाष्टे आणि गणपत पांडुरंग पाष्टे या रहिवाशांच्या घरांचे पत्रे व कौले उडून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच शंकर केरू जाधव आणि राकेश जाधव यांच्या गोठ्यांचे छप्पर उडाले असून, लखमा गोपाळ पाचकुडे यांच्या कुक्कुटपालन केंद्रालाही फटका बसला आहे.
वादळामुळे सार्वजनिक संस्थांचेही मोठे नुकसान झाले आहे. गावातील बुद्ध विहाराची इमारत वादळाच्या झोक्याने बाधित झाली, तर एक नंबर शाळेची कंपाउंड वॉल आणि शौचालय इमारतीचे नुकसान झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि करबुडे हायस्कूलचेही मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय रामगडेवाडी शाळेच्या कौले आणि खिडक्या वाऱ्याने उडाल्याने शाळेच्या इमारतीचे नुकसान झाले.
या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, स्थानिकांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. हवामान खात्याने दिलेला इशारा खरा ठरला असला, तरी या अवकाळी पावसाने तालुक्यातील अनेक भागांतील शेतकरी व ग्रामस्थांच्या चिंता अधिकच वाढवल्या आहेत.

