(रत्नागिरी)
रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाने आपली ताकद दाखवत निवडणुकीच्या रिंगणात अधिकृत प्रवेश केला आहे. लोकनेते बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक २ आणि ८ मध्ये पक्षाचे उमेदवार औपचारिकपणे रिंगणात उतरले असून, शहरात प्रहारची दमदार एन्ट्री झाल्याची चर्चा रंगली आहे.
प्रभाग 2 (अ) मध्ये सोनाली महादेव केसरकर आणि 2 (ब) मध्ये योगेश यशवंत हळदवणेकर, तर प्रभाग 8 (अ) मध्ये स्नेहा शिवराम ठीक यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत लढतीची तयारी जाहीर केली आहे. या अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान कोकणातून जिल्ह्यापर्यंतचे प्रहारचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. त्यात कोकण विभागाध्यक्ष सौ. काजल परेश नाईक, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था जिल्हाध्यक्ष श्री. आनंद त्रिपाठी, प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष श्री. गुरुनाथ सुर्वे, कार्यकारी अध्यक्ष श्री. आदेश खाडे, महिला जिल्हाध्यक्ष सौ. आरती रोहन सुर्वे, संपर्कप्रमुख श्री. शैलेश पोस्तुरे, तसेच रायगड जिल्हाध्यक्ष व रत्नागिरी प्रभारी श्री. सचिन साळुंखे यांचा सहभाग होता.
शहरातील ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या परंपरागत पक्षांप्रति जनतेत नाराजी आहे. अशात प्रहार जनशक्ती पक्षाने “जनतेचा आवाज उचलण्याची आणि प्रत्यक्ष काम करणारी नेतृत्वशैली” याची हमी देत रत्नागिरीला नवा राजकीय पर्याय दिला आहे. ही निवडणूक बदलासाठी लढण्याचा निर्धार करत, प्रहारचे उमेदवार आता जनतेसमोर सज्ज आहेत.

