( संगमेश्वर / प्रतिनिधी )
आपण सिव्हिल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले असले तरी, आपले ध्येय स्पर्धा परीक्षा देऊन राज्य शासनाच्या सेवेत जाण्याचे होते. माध्यमिक शिक्षणाचा पाया व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये भक्कम झाल्यामुळेच आपल्याला हे यश मिळाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करून स्पर्धा परीक्षांकडे वळावे, असे आवाहन प्रियांका पांढरे हिने केले.
संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रियांका लता प्रकाश पांढरे या विद्यार्थिनीची आई याच प्रशालेत इंग्रजीची शिक्षिका आहे तर वडील, बेलारी हायस्कूल येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. घरातूनच उच्च शिक्षणाची परंपरा असल्याने बालपणापासूनच प्रियांका हिने उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले होते. आई-वडिलांची साथ आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे कठोर परिश्रम घेऊन नुकतीच तिची महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत भूमी अभिलेख विभाग सरळ सेवा स्पर्धा परीक्षेतून भूकर मापक मुंबई या पदी निवड झाली आहे. संस्था आणि प्रशालेतर्फे आयोजित सत्कार समारंभात प्रियांका ही बोलत होती.
या पदावर निवड झाल्यानंतर प्रियांका व्यापारी पैसा फंड संस्था आणि पैसा फंड इंग्लिश स्कूल मध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज दाखल झाली. आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी पैसा फंड संस्थेच्या वतीने सचिव धनंजय शेट्ये यांच्या हस्ते प्रियांकाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे मुख्याध्यापक सचिन देव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील यावेळी प्रियांकाचे अभिनंदन केले. संस्था आणि प्रशालेच्या वतीने यथोचित असा सन्मान केल्याबद्दल प्रियांका हिने कृतज्ञता व्यक्त केली.
प्रारंभी सचिव धनंजय शेट्ये यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. क्रीशा इंदानी हिने उपस्थित सर्वांना असाक्षरतेची शपथ दिली. याचवेळी युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर रत्नागिरी आणि मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एआय परीक्षेत प्रशालेतील सौरभ विठोबा गुरव बारावी कॉमर्स आणि प्रियल विजय गुरव इयत्ता नववी यांनी अनुक्रमे द्वितीय आणि उत्तेजनार्थ यश प्राप्त केल्याबद्दल तसेच एन एम एम एस परीक्षेत स्वप्नाली लालासो टकले हिने यश प्राप्त केल्याबद्दल या विद्यार्थ्यांचा सचिव धनंजय शेट्ये आणि मुख्याध्यापक सचिन देव खामकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

