बँक खात्यातून होणाऱ्या संशयास्पद व्यवहारांना वेळीच रोखता यावे, यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) डिजिटल पेमेंट व्यवस्थेत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. नव्या प्रस्तावित नियमांनुसार, ग्राहकांना एका क्लिकवर आपल्या खात्यातून पैसे बाहेर जाणारे डिजिटल व्यवहार थांबवता येणार आहेत. यासाठी ‘स्टॉप स्विच’ ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग सुरू किंवा बंद करण्यापासून ते व्यवहारांची मर्यादा निश्चित करण्यापर्यंतचे अधिकार ग्राहकांना मिळणार आहेत. मोठ्या रकमेच्या काही व्यवहारांसाठी विश्वासू व्यक्तीची मंजुरी घेण्याची व्यवस्थाही प्रस्तावित करण्यात आली आहे. या बदलांसाठी आरबीआयने मसुदा मार्गदर्शक तत्त्वे सादर केली आहेत.
नवीन बँक खाते उघडणाऱ्या ग्राहकांसाठीही महत्त्वाचा बदल प्रस्तावित आहे. खाते सुरू करताना इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगसारख्या डिजिटल पेमेंट सुविधा सुरुवातीला बंद ठेवण्यात येतील. ग्राहकाने स्पष्ट संमती दिल्यानंतर आणि आवश्यक ओळख पडताळणी पूर्ण झाल्यावरच या सुविधा सुरू करता येतील. गरजेनुसार ग्राहकांना या सेवा काही काळासाठी बंद ठेवण्याचाही पर्याय असेल. पुन्हा सेवा सुरू करताना बँकेकडून ओळख पडताळणी केली जाईल. डिजिटल पेमेंट सुविधा सुरू केल्यानंतर पहिल्या २४ तासांसाठी बँकेला पैसे हस्तांतरित करण्याची एकूण मर्यादा निश्चित करावी लागेल. त्यानंतर बँकेच्या जोखीम मूल्यांकनानुसार ही मर्यादा टप्प्याटप्प्याने वाढवता येईल.
प्रस्तावित नियमांमध्ये व्यवहारांच्या मर्यादांबाबतही ग्राहकांना अधिक अधिकार देण्यात आले आहेत. प्रत्येक व्यवहारासाठी, विशिष्ट व्यक्तीला पैसे पाठवण्यासाठी किंवा दिवसभरातील एकूण व्यवहारांसाठी स्वतंत्र मर्यादा निश्चित करता येईल. सर्व डिजिटल पेमेंट माध्यमांमधून होणाऱ्या व्यवहारांची एकत्रित मर्यादाही ग्राहक ठरवू शकतील. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला एका दिवसात जास्तीत जास्त २० हजार रुपये पाठवण्याची मर्यादा ग्राहकाने निश्चित केली, तर बँकेची नियमित व्यवहार मर्यादा अधिक असली तरी संबंधित व्यक्तीला त्यापेक्षा जास्त रक्कम पाठवता येणार नाही. ठरावीक वेळेत डिजिटल पेमेंट सुविधा बंद ठेवण्याची सोयही प्रस्तावित आहे.
डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्डच्या वापराबाबतही आरबीआयने बदल सुचवले आहेत. नवीन कार्ड जारी करताना सुरुवातीला ते भारतातील एटीएम आणि दुकानांमधील पेमेंट टर्मिनलवर वापरण्यासाठी सुरू असतील. मात्र, ऑनलाइन व्यवहार, संपर्कविरहित पेमेंट आणि परदेशातील व्यवहारांसाठी असलेल्या सुविधा सुरुवातीला बंद ठेवण्यात येतील. ग्राहकांना आवश्यकतेनुसार या सुविधा सुरू किंवा बंद करता येतील. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी स्वतंत्र आर्थिक मर्यादाही निश्चित करता येईल. परकीय चलनातील प्रीपेड कार्डना मात्र सुरुवातीच्या या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
आरबीआयच्या प्रस्तावातील विशेष लक्षवेधी तरतूद म्हणजे ‘स्टॉप स्विच’. खात्यातून अनधिकृतपणे पैसे जात असल्याचा संशय आल्यास ग्राहकाला या सुविधेद्वारे स्वतः सुरू केलेले पैसे बाहेर जाणारे व्यवहार तातडीने थांबवता येतील. ही सुविधा सक्रिय केल्यानंतर नवीन डेबिट व्यवहार करता येणार नाहीत. तसेच नवीन पेमेंट मँडेट तयार करणे, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देणे किंवा नवीन थर्ड पार्टी यूपीआय ॲपवर बँक खाते नोंदवणेही शक्य होणार नाही.
मात्र, ‘स्टॉप स्विच’मुळे खात्यात पैसे जमा होण्याच्या व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहकाला खात्यात येणारी रक्कम स्वीकारता येईल. याशिवाय, यापूर्वीच सुरू असलेले नियमित पेमेंट मँडेट, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन, बँकेचे शुल्क आणि कर्जाचे हप्ते यांसारखे काही व्यवहार या सुविधेच्या कक्षेत येणार नाहीत. ही सुविधा बंद करून डिजिटल व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी ग्राहकाला बँकेकडे ओळख पडताळणी करावी लागेल.
मोठ्या रकमेच्या व्यवहारांमध्ये सुरक्षितता वाढवण्यासाठी आरबीआयने ‘ट्रस्टेड पर्सन मेकॅनिझम’ (Trusted Person Mechanism) ही संकल्पनाही मांडली आहे. यानुसार, ग्राहकाला स्वतःच्या विश्वासातील १८ वर्षांवरील एका व्यक्तीची निवड करता येईल. ग्राहकाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक रकमेच्या पात्र व्यवहारांसाठी या व्यक्तीची मंजुरी आवश्यक असेल.
अशा व्यवहाराची माहिती निवडलेल्या विश्वासू व्यक्तीला पाठवली जाईल. त्यात व्यवहाराची रक्कम आणि पैसे कोणाला पाठवले जाणार आहेत, याचा तपशील असेल. संबंधित व्यक्तीला व्यवहार मंजूर करण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी एक तासाचा कालावधी दिला जाईल. या मुदतीत मंजुरी मिळाली नाही किंवा व्यवहार नाकारण्यात आला, तर तो पूर्ण होणार नाही. या व्यवस्थेसाठी ग्राहक आणि त्याने निवडलेल्या व्यक्ती या दोघांचीही संमती आवश्यक असेल.
मात्र, विश्वासू व्यक्तीला ग्राहकाच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम, ठेवी किंवा अन्य आर्थिक माहिती पाहण्याचा अधिकार नसेल. तसेच ग्राहकाचे खाते चालवणे किंवा स्वतःहून व्यवहार करण्याची परवानगीही तिला मिळणार नाही. यूपीआयद्वारे होणारे व्यवहार, व्यापाऱ्यांना केलेली देयके आणि आधीपासून सुरू असलेले नियमित पेमेंट या व्यवस्थेतून वगळण्यात आले आहेत.
डिजिटल व्यवहारांमधील फसवणुकीसाठी बँकांची जबाबदारी निश्चित करण्याबाबतही आरबीआयने प्रस्ताव मांडला आहे. ग्राहकांना डिजिटल व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याची सुविधा उपलब्ध न करून देणे, त्यांनी निश्चित केलेल्या व्यवहार मर्यादांचे पालन न करणे, व्यवहारांचे अलर्ट न पाठवणे किंवा फसवणुकीची तक्रार मिळाल्यानंतरही वेळेत कारवाई न करणे, या बाबी बँकेची चूक म्हणून ग्राह्य धरल्या जाऊ शकतात.
याशिवाय, बँकेच्या तांत्रिक यंत्रणेतील बिघाड, सुरक्षेतील त्रुटींमुळे झालेली फसवणूक किंवा बँकेचे कर्मचारी आणि कंत्राटदार यांचा फसवणुकीतील सहभाग आढळल्यास संबंधित बँकेला जबाबदार धरले जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकांच्या डिजिटल व्यवहारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात बँकांकडून झालेल्या निष्काळजीपणाची जबाबदारी निश्चित करण्याची तरतूदही या मसुद्यात आहे.
आरबीआयच्या नियोजनानुसार, या प्रस्तावातील बहुतांश नवीन नियम १ जुलै २०२७ पासून लागू करण्याचा विचार आहे. बँकांना त्यापूर्वीही या नियमांची अंमलबजावणी करता येईल. बँकांच्या निष्काळजीपणाच्या व्याख्येशी संबंधित काही तरतुदी १ जानेवारी २०२७ पासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे. हे प्रस्तावित नियम सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील व्यावसायिक बँकांना लागू होतील. मात्र, स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट्स बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि स्थानिक क्षेत्रीय बँकांना या नियमांच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. सध्या हे नियम मसुद्याच्या स्वरूपात असून, आरबीआयकडून अंतिम निर्देश जारी झाल्यानंतरच त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे.


